बाप – लेकाच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याची इतिहास नोंद घेईल – बी.रंगराव
कवि खेमराज भोयर यांचा "सालं अतीच झालं"' मुलगा शृंखल भोयर यांच्या "द स्टेडिली चेंज"काव्यसंग्रहाचे प्रकाशन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
नागपूर ( 11 सप्टेंबर ) : “साहित्य विश्वात चौकटीच्या बाहेर पडून लिहणारी खूप कमी लोक आहेत.त्यात खेमराज भोयर यांचे नाव प्रामुख्याने घ्यायलाच हवे. त्यांची कविता, गाणी म्हणजे सामान्य माणसाचा आवाज.खेमराज भोयर या विद्रोही आंबेडकरी कवीचे नाव कविता क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचे आहे. आपल्या विद्रोही कवितेतून समाजातील रुढी, नकली नेत्यांचे दंभ, जातीयवाद, धर्मांधांच्या कारवायावर तुटून पडणारा कवी म्हणून खेमराज भोयर यांना लोकं ओळखतात. त्यांचे कवितांचे पहाडी आवाजातील सादरीकरण तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन जाते. त्यांचा कवितासंग्रह ‘सालं अतीच झालं’ या काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन झाले.खेमराज भोयर यांचा मुलगा शृंखल भोयर खेळण्या-बागळण्याच्या वयात जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान मांडतो, तेही इंग्रजी भाषेत. ही भारतीय समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शृंखल भोयर यांचा ‘द स्टेडिली चेंज ‘ हा इंग्रजी भाषेतील काव्यसंग्रह याच कार्यक्रमात एकत्र प्रकाशित झाला.ह्या बाप – लेकाच्या कवितासंग्रहाच्या एकाच वेळी, एकाच समारंभात झालेल्या प्रकाशन सोहळ्याची इतिहास नोंद घेईल, ” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आंबेडकरवादी साहित्यिक, विचारवंत,मुंबई विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख बी.रंगराव यांनी केले.
शनिवारी ( 10 सप्टेंबर ) दुपारी सामाजिक न्याय विभाग सभागृह, दिक्षा भूमी रोड, नागपूर येथे कवी खेमराज भोयर, शृंखल खेमराज भोयर या बाप – लेकांच्या मराठी व इंग्रजी भाषेतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवर साहित्यिक, विचारवंत, समीक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या सोहळ्यात अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमात भाष्यकार म्हणून डॉ. वंदना महाजन, प्रा.डॉ.अनमोल शेंडे, डॉ. दिलीप चव्हाण, प्रा. माधव सरकुंडे, प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर, पत्रकार प्रमोद काळबांडे, डॉ. धनंजय वंजारी,सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे, कवी लोकनाथ यशवंत, नारायणा विद्यालयमचे प्राचार्य रेखा नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सालं अतीच झालं’ या काव्यसंग्रहावर डॉ. वंदना महाजन व डॉ .अनमोल शेंडे यांनी भाष्य केले.डॉ.वंदना महाजन म्हणाल्या की, खेमराज भोयर यांची कविता बोलीभाषेत जरी असली तरी ती स्वतंत्र आहे.ती सर्वसामान्याची वाटते, तिला तुकाराम व ज्योतीबाचा वारसा आहे.डॉ.अनमोल शेंडे म्हणाले की, खेमराज भोयर यांची कविता चळवळीचा आवाज आहे.काव्यातील मुक्तछंद,गाणी अभंग,लावणी, गझल हे सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
डॉ.दिलीप चव्हाण हे शृंखल भोयर यांच्या ‘ द स्टेडिली चेंज ‘ या काव्य संग्रहावर भाष्य करतांना म्हणाले की, शृंखल भोयर यांची कविता ही मानवी बदलाची संकल्पना आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सांगते.मृत्यूनंतरही जीवंत रहायचं असेल तर कर्म हा स्वर्ग आहे,बाकी स्वर्ग,नरक ही संकल्पना थोतांड आहे.त्यामुळे शृंखलच्या लेखनाला भविष्य आहे.डॉ.सिध्दार्थ गायकवाड म्हणाले की, शासनाकडे सामाजिक विभागाकडून शृंखलचा कवितासंग्रह सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तेव्हाच हे विचार पोहचतील.त्यानंतर शृंखल व खेमराज भोयर यांनी मनोगत व्यक्त केले.
पहिल्या सत्राचे सुत्रसंचलन बादल श्रिरामे,प्रास्ताविक अनिरुद्ध वनकर यांनी केले
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर दुसर्या सत्रात कवीसंमेलनाची सुरुवात झाली.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी उषाकिरण आत्राम (दरेकसा) होत्या.डॉ. अजय खडसे (अमरावती) व नरेंद्र सीनारकर (बल्लारपूर) यांनी सूत्रसंचालन केले. कवीसंमेलनात राजेश डंभारे (वर्धा), रमेश बुरबुरे (वडसा), जित्या जाली (पालघर), सागर काकडे (सातारा ), सरिता सातारडे, धनवाग झारखंड, शेषराव धांडे ( वाशिम), महेंद्र गायकवाड ( नागपूर), अभिजित ठमके ( वरोरा), रसपाल शेंद्रे (हिंगणघाट), प्रा. रवी चापके, प्रा. महेश हंबर्डे, प्रा. विलास भवरे, प्रा.सुरेश धनवे (पुसद) प्रशांत ढोले, वृषाली मारतोडे (वर्धा), राजेश मडावी (इल्लूर), गोविंद पोलाड, राजेश महाले ( अमरावती), स्नेहल सोनटक्के ( यवतमाळ), गीत घोष (वणी) सीमा भसारकर, नागेश वाहुरवाघ (अकोला), संगीता धोटे (मारडा), शरद सहारे (वेलतूर), अजिज खान पठाण (कोराडी), मनोहर गजभिये (दत्तवाडी), प्रकाश दुलेवाले, संजय सहारे, माधुरी वसंत शोभा, लीलाधर गायकवाड (नागपूर ) या कवीनी कविता सादर केल्या.आभार शुध्दोधन गराडकर यांनी केले तर आयोजक डॉ शुभांगी भोयर, जगदिश डवरे, बाबुराव जुमनाके, नागेश वाहुरवाघ, प्रिया जांभूळकर यशस्वी पार पाडली.