नैसर्गिक साधन संपत्तीचा काळजीपूर्वक वापर करावा -प्रा. अर्चिता माळगे
स्वेरीत ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा

छायाचित्र- राष्ट्रीय विज्ञान दिवस चिन्ह, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व प्रमुख पाहुण्या म्हणून जनरल सायन्स इंजिनिअरिंगच्या प्रा. अर्चिता माळगे.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘निसर्ग आणि विज्ञान यांच्या माध्यमातून मानवाने संशोधनात प्रचंड प्रगती केली असून त्याद्वारे निर्माण झालेली संशोधने ही भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहेत. आज भारतात अधिकाधिक संशोधने होत आहेत. संशोधन करत असताना निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीची नासाडी न करता तिचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. या नैसर्गिक संपत्तीचा वापर भविष्यकाळात योग्य पद्धतीने केल्यास आणि अतिरेक टाळल्यास आपण त्या ऊर्जास्त्रोतांचा दीर्घकाळ वापर करू शकतो.’ असे प्रतिपादन प्रा.अर्चिता माळगे यांनी केले.
स्वेरीच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल आणि स्वेरीचा सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जनरल सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या प्रा. माळगे ह्या मार्गदर्शन करत होत्या. ‘विज्ञान दिवस का साजरा करायचा?’ हे स्पष्ट करताना प्रा. माळगे पुढे म्हणाल्या की, ‘भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही. रामन यांनी ‘प्रकाश शास्त्रावर’ आपला जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला. जो ‘रामन परिणाम’ म्हणून आज विश्वात ओळखला जातो. म्हणून तेव्हापासून डॉ. रामन यांचा जन्मदिवस असलेला २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.शास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा, डॉ.विक्रम साराभाई, डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. स्वामीनारायण, जगदीश बोस, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.प्रशांत पवार या शास्त्रज्ञांच्या संशोधनाची पाहणी केल्यास असे आढळते की निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता त्यांनी संशोधने केली आहेत. मानवाकडून होणाऱ्या नैसर्गिक स्त्रोतांच्या नासाडीतून आपले प्रचंड नुकसान होत आहे. वृक्षतोडी मुळे निसर्गाची अपरिमित हानी होत असून यात जर अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. यासाठी विज्ञानाचे फायदे आणि नुकसान या दोन्ही बाजू विचारात घेऊन विज्ञानाचा वापर नेमका कसा करायचा हे आपल्या कृतीवर अवलंबून आहे. यासाठी आपल्या मनातील कल्पना शक्तीचा वापर पेटंट च्या माध्यमातून करता येऊ शकतो. आपल्या जवळच्या संकल्पना समाजामध्ये संशोधनाच्या माध्यमातून सादर केल्यास पुढे ते पेटंट जागतिक कीर्तीचे बनून त्यांचा स्वीकार केला जाईल. एकूणच विज्ञान आणि निसर्ग या दोन्हीचा फायदा स्वतःला व समाजाला मिळणार आहे. सध्या सुरु असलेल्या युक्रेन आणि रशिया मधील युद्धामुळे देखील निसर्गाला हानी पोहचत आहे. यासाठी विज्ञान आणि निसर्ग यामधील चांगल्या गोष्टीचा योग्य वापर करावा. केवळ विज्ञानामुळे आपण कोरोना सारख्या महामारीपासून दूर राहू शकलो. विज्ञानाचा मानवी जीवनास जेवढा फायदा आहे तेवढेच नुकसान देखील आहे. यासाठी नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे गरजेचे असून निसर्गाची अधिक हानी होऊ नये यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे.’ असे सांगून विज्ञानाचे दुष्परिणाम काय आहेत याचीही माहिती दिली. ऑनलाईन चाललेल्या या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला जवळपास २०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सत्यवान जगदाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.





