सुधारणावादाची निर्मिती ही क्रांतीला नष्ट करण्यासाठीच असते – अँड. शाम तांगडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सुधारणावादाची निर्मिती ही क्रांतीला नष्ट करण्यासाठीच असते – अँड. शाम तांगडे
अंबाजोगाई : – सारख्याच घटना आणि संघटना नेहमी संभ्रम निर्माण करतात म्हणून भेदरेषा समजून घेणे आवश्यक आहे. प्रस्थापितांनी भावना , कल्पना व अज्ञान यांच्या एकत्रिकरणातून कर्मठतेला कायद्याचे रुप दिले. ही आपल्या हिताची व्यवस्था प्रत्यक्ष देवानेच निर्माण केली आहे असे त्यांनी प्रचारीत केले. या अपमतलबी व्यवस्थेला सुरुंग लावण्याच्या गरजेतून क्रांतीवाद जन्मास येत असतो. क्रांतीसुर्य जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाने मोठ्या क्रांतीकार्याला सुरुवात करून या व्यवस्थेला उलटून टाकण्याचे कार्य सुरुवात केले होते. तेव्हा सुधारणावादी फारच मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले. क्रांतीची वेगळी ओळखच निर्माण होऊ नये म्हणून सुधारणावादी कार्यरत होतात , त्यांचा अंतस्थ हेतू जून्या व्यवस्थेचे संरक्षण करणे हाच असतो. खरे तर सुधारणावादाची निर्मिती ही क्रांतीकार्याला नष्ट करण्यासाठीच होत असते. असे विचार अँड. शाम तांगडे यांनी व्यक्त केले आहेत. संघर्षभूमी परिवाराच्या वतीने नववर्षानिमित्त प्रत्येक गुरुवारी संपन्न होणाऱ्या ” संवाद आंबेडकरवादी चळवळीचा ” या साप्ताहीक ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘ तत्कालीन प्रवाह व सत्यशोधक समाज ‘ या विषयावर त्यांनी सविस्तर विचार मांडले.
याप्रसंगी बोलतांना अँड. शाम तांगडे यांनी क्रांतीसुर्य जोतीराव फुले यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. कर्मठांची व्यवस्था टिकविणाऱ्या अज्ञानाचा केंद्रक हा महीला आणि अस्पृश्य आहे हे जोतीराव फुले यांनी प्रथम ओळखले. या घटकांना प्रवाहीत करण्यासाठी त्यांनी शाळा सुरु केल्या. घरची विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून अस्पृश्यतेला कृतीशील नकार दिला. शुद्र-अतिशुद्र एकच आहेत अशी प्रस्तावना लिहून त्यांनी कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहला. ग्रंथकार सभेच्या निमंत्रणला धुडकावून लाऊन त्यांनी सुधारणावादी कार्य व क्रांतीकारी कार्याची भेदरेषा स्पष्ट केली. आपल्या गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी भाकडकथा व देव दैववादावर प्रचंड हल्ला केला. शेतकऱ्याचा असूड या ग्रंथातून शेटजी – भटजीवर हल्ला केला. क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांची चळवळ ही क्रांतिकारी होती. परंतू या चळवळीला प्रशिक्षीत व व्यापक जनाधार लाभला नाही. परिणामी नंतर ती चळवळ ब्राम्हणेतर चळवळ झाली. नंतर ती शिवाजी महाराजांना प्रतिक रुपात घेऊन राजकीय चळवळ झाली. आणि गांधीजींच्या उदयानंतर तर ती काँग्रेसमध्येच विलीन झाली. त्यामुळे या चळवळीचे स्वतंत्र अस्तित्वच नष्ट झाले. गांधींच्या सुधारणावादी चळवळीने फुल्यांची क्रांतीकारी चळवळ गिळंकृत केली , नष्ट केली. खरे तर राजकीय अमिषाला बळी पडल्याने ही चळवळ नष्ट झाली. सुधारणावादाची निर्मिती ही क्रांतिकारी कार्याला कशी नष्ट करते ते यातून स्पष्ट होते. असे ते म्हणाले.
शेवटी शरद मोरे व डॉ विनोद जोगदंड यांनी विचारलेल्या प्रश्नांना अँड. शाम तांगडे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात सामुहीक वंदनेने झाली व सांगता सरणतय गाथेने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय हतागळे यांनी केले. प्रास्ताविक अँड. संदीप थोरात यांनी केले. तर डॉ गणेश सुर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रा धैर्यशील भंडारे , प्रा विलास रोडे , नरेश बनसोड , अँड. दिलीप गोरे , डिगंबर मोरे , अनिल भोसले , शरद मोरे , डॉ गणेश सुर्यवंशी , प्रमोद बनसोडे , डॉ विनोद जोगदंड , दुर्गानंद वाळवंटे , लक्ष्मण व्हावळे , गोपीनाथ भालेराव , प्रा किर्तीराज लोणारे , संजय हतागळे , अँड. संदीप थोरात आदींचा सहभाग होता.