परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा प्रात्यक्षिकांमधून आलेले अनुभव महत्वाचे -युनिट हेड प्रदीप चपळगावकर
स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन ’ साजरा

छायाचित्र- स्वेरीत ‘अभियंता दिना’ प्रसंगी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. मल्लिकार्जुन बुळ्ळा सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग, इन्सेट मध्ये पाहुणे प्रदीप चपळगावकर.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूरः ‘उद्योग जगतात वावरताना विद्यार्थ्यांच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा औद्योगिक समस्या सोडविण्याच्या प्रात्यक्षिक अनुभव क्षमतेला जास्त महत्त्व असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की बाहेरच्या विश्वात वावरताना तुम्हाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी करणे गरजेचे आहे म्हणून विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासी ज्ञानापेक्षा अनुभवाचे धडे गिरवले पाहिजेत. आपण करत असलेल्या कामातुन आनंद घेतला तर ताण तणाव निर्माण होणार नाहीत. आज भारताची जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. एक उद्योग प्रधान देश म्हणून आपण पुढे जात आहोत. आपल्या देशाची निर्यात वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान मिळवावे व औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यास तयार राहावे.’ असे प्रतिपादन कल्याणी ग्रुपचे बिजनेस युनिट हेड प्रदीप चपळगावकर यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या ‘अभियंता दिना’ च्या ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणी ग्रुपचे बिजनेस युनिट हेड प्रदीप चपळगावकर हे गुगल मिट च्या माध्यमातून प्राध्यापक व विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करत होते. विशेष अतिथी म्हणून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे हे उपस्थित होते. प्रारंभी मुख्य प्रवेश द्वाराजवळ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. मल्लिकार्जुन बुळ्ळा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. बुळ्ळा म्हणाले की, ‘मी स्वेरीचा माजी विद्यार्थी असून मी स्वेरीत सातत्याने येत असतो. स्वेरीतील संस्कृती, आदर आणि स्टाफ कडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याच्या भावनेचा खूप आदर वाटतो.’ ऑनलाईन झालेल्या कार्यकर्माच्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ‘अभियंत्यांची नेमकी भूमिका स्पष्ट करताना तरुण अभियंत्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे.’ असे सांगून अभियंत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे विचार मांडले. पुढे बोलताना चपळगावकर यांनी ‘तंत्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचे करिअर’ या विषयांना स्पर्श करून भविष्यात इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील स्पर्धा समजावून दिली. विद्यार्थ्यांनी भविष्यात करावयाच्या वाटचालीबाबतही त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी संघटनेचे महेश कांबळे यांनी ‘इंजिनिअरींग झाल्यानंतर अभियंत्यांची भूमिका काय असते? यावर विवेचन केले. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी देखील अभियंता म्हणून सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्यावर प्रकाश टाकून सिव्हील इंजिनिअरिंगचे कार्य करताना अभियंत्यांनी अभ्यासू आणि चौफेर चौकस दृष्टी असावी, असे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, ज्येष्ठ संस्थापक सचिव विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या ऑनलाईन चाललेल्या ‘अभियंता दिना’ला उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे अजूनही महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे प्रतिमा पुजनाला निवडक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रशासन अधिष्ठाता प्रा. मिलिंद कुलकर्णी, प्रवेश प्रक्रिया आधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे, डॉ. व्ही.एस. क्षीरसागर, डॉ. वैष्णव काळे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी आभार मानले.