शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार योग्य बदल करून शिक्षण देणे गरजेचे’ -शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार
स्वेरीच्या डॉ. प्रशांत पवार यांचे ‘शैक्षणिक पद्धती व साधनांचा वापर’ यावर मार्गदर्शन संपन्न

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
- श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘आपण शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखणे आवश्यक असून त्यांना शिकवलेले समजण्यासाठी नेमकं कशाप्रकारे शिकवले पाहिजे, त्यांना काय पाहिजे आहे? या बाबींचा अंदाज घेऊन व त्यांची मानसिकता ओळखून त्यानुसार त्यांना शिक्षण देणे क्रमप्राप्त ठरेल. शिक्षकांनी मी जे करतो, ते का करतो? हा प्रश्न स्वतःला विचारून त्यानुसार शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल दिसून येतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण करून त्यानुसार शिक्षण दिले गेले पाहिजे. यासाठी वेळ लागेल पण पुढे विद्यार्थी लक्ष देवू लागतो. म्हणून शिक्षकांच्या दृष्टीने ‘व्हाय, हाऊ आणि व्हाट’ हे तीन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच ‘डिसिजन, डिटरमिनेशन आणि डेडिकेशन’ हे देखील शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात योग्य दिशा मिळते.’ असे प्रतिपादन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजीवकुमार राठोड, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी श्री. महारुद्र नाळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. बिभीषण रणदिवे व श्री. मारुती लिगाडे यांच्या सौजन्याने व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी झूम अॅपद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘विद्यार्थी विकासासाठी विविध शैक्षणिक पद्धती व साधनांचा वापर’ या विषयावर यावेळी डॉ.पवार शिक्षकांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी डॉ. पवार यांनी खर्डी गावात घेतलेल्या प्राथमिक शिक्षणापासून ते आयआयटी पर्यंतच्या शिक्षणाची व केंद्र सरकारचा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर्स अवॉर्ड’ प्रथम क्रमांकाने मिळवण्यापर्यंतची वाटचाल सांगितली. पुढे बोलताना डॉ.प्रशांत पवार म्हणाले की, ‘विद्यार्थ्याना शिक्षण देताना त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवावे लागते, त्यानंतर पटवून द्यावे लागते. पुढे त्यांना समजून घेण्याची सवय होते आणि विद्यार्थ्याला शिक्षणात गोडी निर्माण होते. आता कोविड-१९ मुळे शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल झाला असून याचा विद्यार्थ्यांवर व शिक्षणावरही प्रचंड परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत देखील बदल झाला असून तंत्रज्ञान देखील बदललेले आहे. या कोरोना महामारीमुळे अनेकांना तंत्रज्ञान माहीत झाले. हा एक मोठा सकारात्मक बदल झालेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण देताना प्रथम त्याचा शिक्षण घेण्याचा दृष्टीकोन समजून घेतला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांच्या चुकीच्या विचारांना देखील प्रथम प्रेरणा दिली पाहिजे. त्यानंतर त्याने चुकीचे उत्तर का दिले त्यामागची मानसिकता जाणून घेतली पाहिजे. ऑनलाईन शिक्षण देताना सुरुवातीला आपण होऊन शिक्षण समजावून घेतले पाहिजे. सुरवातीला विद्यार्थी कसाही असला तरी तो शाळेतून परत जाताना त्याच्यात खूप फरक जाणवला पाहिजे. एक चांगला बदल त्याच्यातून दिसणे अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.’ असे सांगून पुढे ‘न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग’ ची माहिती देताना डॉ.पवार म्हणाले की, विद्यार्थी हे बघून शिकणारे, ऐकून शिकणारे आणि करून शिकणारे अशा तीन प्रकारचे विद्यार्थी आपल्या शाळेत असतात. यावेळी त्यांचा मेंदू कशा पद्धतीने काम करतो ? हे पाहिले पाहिजे. विद्यार्थी मेंदूचा वापर कसा करतात हे ही पाहिले पाहिजे. असे सांगुन डॉ. पवार यांनी शिक्षकांना गुगल फॉर्म कसा तयार करावा ? व तो कसा भरावा? याचेही प्रशिक्षण दिले. यावेळी मंगेश परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शन सत्रानंतर जिल्हा परिषद शाळेच्या अनेक शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर प्रश्न विचारले असता डॉ. पवार यांनी तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगून ऑनलाइन शिक्षण पद्धतीविषयी मोलाचे मार्गदर्शन दिले. यावेळी शिक्षकांनी असे मार्गदर्शनपर कार्यक्रम नियमितपणे व्हावेत अशीही मागणी केली. यावेळी उपस्थित शिक्षकांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी पंढरपूर तालुक्यातील २५० हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला. शिक्षकांतर्फे प्रशांत वाघमारे यांनी आभार मानले.