समन्यायी पाणी वाटपाचा जागतिक आश्चर्य ठरणारा बंदिस्त पाईप लाईनचा प्रकल्प राज्यभर राबवावा :भारत पाटणकर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
______________
आटपाडी दि . १५ ( प्रतिनिधी )
समन्यायी पाणी वाटपाचा जागतिक आश्चर्य ठरणारा बंदिस्त पाईप लाईनचा पथदर्शक प्रकल्य राज्याला मार्गदर्शक असून राज्याने याचे सार्वत्रीकरण करीत संपूर्ण राज्यात राबवावा ,अशी मागणी पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाचे अर्ध्ययु डॉ . भारत पाटणकर यांनी केली .
क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या ९९ व्या जयंतीदिना निमित्त आणि क्रांतीविरांगणा इंदुताई पाटणकर यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त आयोजित पाणी मिळविण्याच्या विजयी मेळाव्यात ऑनलाईन मार्गदर्शन करताना केली . आटपाडी येथील माणगंगा कृषी विद्यालयाच्या सभागृहात या ऑनलाईन विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
डॉ भारत पाटणकर यांनी, या समन्यायी बंदिस्त पाईपलाईन पथदर्शक प्रकल्पाची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. देशामध्ये कुठेही असा प्रयोग झाला नाही. शेतीच्या पाण्याचे देशपातळीवर नियोजन करताना हा प्रकल्प मार्गदर्षक आणि क्रांतिकारक ठरणार आहे. त्यामुळे पथदर्षक प्रकल्प लवकर पूर्ण करून संपूर्ण राज्यात त्याचे सार्वत्रीकरण होणे गरजेचे आहे. अशाप्रसंगी सरकारच्या वतीने आंदोलनाला प्रतिसाद देवून ज्यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आणि पथदर्शक प्रकल्याला तत्वतः मंजुरी दिली आणि पुढील प्रक्रियेला आधार करून दिला त्या दिवंगत आर आर आबा पाटील यांची डॉ. भारत पाटणकरांनी आठवण नमूद केली . मी, राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचे निर्माते खासदार शरद पवार यांचेशी या पथदर्शक प्रकल्पाविषयी दोन – तीन वेळा चर्चा केलेली आहे. त्यांनी आटपाडीला येण्याचे , हा पथदर्शक प्रकल्प पाहण्याचे, आणि समजून घेण्याचे मान्य केले आहे . लवकरच त्यांचा यासाठीचा दौरा होणार असल्याचे यावेळी पाटणकरांनी सांगीतले .
मेळाव्याचे निमंत्रक चळवळीचे नेते आनंदराव बापू पाटील यांनी तालुक्यातील इंचन इंच जमिन ओलीताखाली आली पाहीजे ,पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहीजे, जमीन असणारा बरोबर जमीन नसणाराऱ्या कुटुंबाला ६००० घनमीटर पाणी मिळाले पाहीजे असा चळवळीचा वज्र निर्धार असल्याचे स्पष्ट केले .
यावेळी सुशांत देवकर, के. जे . जॉय,’ कॉ . जयंत निकम, सादिक खाटीक, गणेश बाबर ,सौ अनिता पाटील, राजाराम मरगळे यांची ऑनलाईन भाषणे झाली .
यावेळी भारततात्या पाटील, विलासनाना शिंदे,महादेव दाजी देशमुख, दत्ता यमगर, सौ . सुजाता टिंगरे, सरिता भगत नेहा भडभडे अब्रॅहम सॅम्यूयल, राजेंद्र सावंत, भाऊसाहेब लिंगडे, मुरलीधरआबा पाटील,अशोक लवटे, अरुण टिंगरे हे उपस्थित होते . स्वागत मनोहर विभूते यांनी केले तर आभार विजय पुजारी यांनी मानले .