भामचंद्र डोंगर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मधुसूदन महाराज करणार आंदोलन
सरकारला सद् बुध्दी यावी यासाठी संत तुकाराम गाथा पारायण


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेला पुणे जिल्ह्यातील भामचंद्र डोंगर लँडमाफीया पोखरून काढत असून शासन यास पाठीशी घालत असल्याचा आरोप संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक मधुसूदन महाराज पाटील यांनी केला आहे. ही तपोभूमी अतिक्रमणमुक्त करण्याची सद्बुध्दी शासनास यावी यासाठी वारकरी संप्रदायासह दि.10 मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर गाथा पारायण केले जाणार आहे.
याबाबत संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर येथे पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले होते. यास शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, संघर्ष समितीच्या कार्याध्यक्ष माधवी माने, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, मराठा महासंघाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे-पाटील आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.
याबाबत बोलताना मधुसूदन महाराज यांनी, संत तुकाराम महाराज यांनी भामचंद्र, भंडारा व घोराडा या डोंगरावर मोठे तप केले होते. या पैकी भामचंद्र डोंगरावरच महाराजांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला. या विषयीचा महाराजांचा अभंग देखील आहे. यामुळे वारकरी संप्रदायासाठी ही भूमी अतिशय पवित्र असून याचे संरक्षण, संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र भामचंद्र डोंगराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून बिल्डर, लँडमाफीया येथे बेसुमार उपसा करीत आहेत. या विरोधात आम्ही 2007 पासून आंदोलन करीत आहोत. या आंदोलनामुळेच डाऊ कंपनी येथून हद्दपार झाली. परंतु अद्याप भामचंद्र डोंगर अतिक्रमणमुक्त होऊ शकला नाही अशी माहिती दिली.
विशेष म्हणजे या डोंगरावर प्राचीन गुफा असून अडीच हजार वर्षा पूर्वीच्या लेण्या आहेत. पुरातत्व विभाग, वन विभाग यांच्या अंतर्गत येथील काही भाग असताना देखील मोठ्या प्रमाणात मातीचा, दगडांचा उपसा सुरू आहे. याविरोधात अनेक आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने 2011 साली हे क्षेत्र राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचना काढली आहे. तरीही याची अंमलबजावणी होत नाही. या विषयी विविध मंत्री, खासदार, आमदार यांना भेटून देखील कारवाई होत नसल्याने आता शासनास सद्बुध्दी व्हावी म्हणून थेट आझाद मैदानावर संत तुकाराम गाथेचे पारायण सुरू करणार असल्याचे मधुसूदन महाराज यांनी सांगितले.
सदर आंदोलनास वारकरी फडकरी दिंडी संघटना, वारकरी पाईक संघ, औसा संस्थान आदींसह विविध महाराज मंडळींनी पाठींबा दिला आहे. यानंतरही शासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास वारकऱ्यांमधील विद्रोही तुकाराम जागा झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मधुसूदन महाराज पाटील यांनी दिला आहे.



