पंढरपूर नगरपरिषदेकडून ‘नागरिकांचा जाहीरनामा’प्रसिद्ध
अमरजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश...

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- पंढरपूर मर्चंट को-ओप बँक,पंढरपूरचे चेअरमन व कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून,पंढरपूर नगरपरिषदेने “”नागरिकांचा जाहीरनामा”” प्रसिद्ध केला आहे.
पंढरपूर नगरपरिषदेने नागरिकांचा जाहीरनामा जाहीर करणे कायद्याने बंधनकारक असताना,गेली अनेक वर्ष तो जाहीर करण्यात आलेला नव्हता.ही बाब लक्षात घेता अमरजित पाटील यांनी सातत्याने सदर जाहीरनामा प्रसिद्ध करून,नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीवर लावण्याची मागणी लावून धरली होती.त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेने नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूस प्रसिद्ध केलेला आहे.
नागरिकांचा जाहीरनामा प्रसिध्दीकरणामुळे नागरिकांना त्यांची नगरपरिषद मधील कोणत्याही विभागातील कामे करून घेण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे कोणत्या विभागात व कोणत्या अधिकाऱ्याकडे जमा करावयाची आहेत हे समजेल.तसेच,सदर अधिकाऱ्यांनी नागरिकांचे काम किती दिवसात पूर्ण केले पाहिजे याबाबत माहीत नागरिकांना कळेल.तसेच,सदर कामासाठी किती शुल्क आहे यासह वेळेत काम न झाल्यास नेमकी तक्रार कुणाकडे करावयाची याची माहीत नागरिकांना या जाहीरनाम्याच्या माध्यमातून समजून येईल.अगदी रोडलाईट बंद असल्यास किंवा आपल्या परिसरातील कचरा वेळेत न उचलला गेल्यास आपण संबंधित अधिकारी यांना निःशुल्क तक्रारी अर्ज करून दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करून घेवू शकता. पंढरपूर नगरपरिषदेशी संबंधित आपली कामे करताना पंढरपुरातील नागरिकांना या जाहीरनाम्याचा उपयोग होणार आहे.तरी पंढरपुरातील नागरिकांनी सदर नागरिकांच्या जाहीरनाम्याचा अधिकाधिक लाभ घेवून आपली कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत,असे आवाहन अमरजित पाटील यांनी केले आहे.


