स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त सरकोली येथे अभिवादनाचा कार्यक्रम
ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनसेवेतून नानांच्या आठवणींना उजाळा; 130 जणांचे रक्तदान


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
सरकोली (ता. पंढरपूर) : पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे भाग्यविधाते, सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व स्वर्गीय आमदार भारत (नाना) तुकाराम भालके यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त सरकोली येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या रसाळ वाणीतून सादर केलेल्या कीर्तनाने त्यांनी उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच नानांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी बोलताना ह.भ.प. सागर महाराज म्हणाले की, नेता कसा असावा, तर सर्वसामान्य माणसाची जाण असणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपलेसे करणारा आणि सर्वांवर प्रेम करणारा असावा. असे प्रेमळ नेतृत्व पंढरपूर तालुक्याला लाभले, हे तालुक्यातील जनतेचे भाग्य आहे. आज नाना आपल्यात नसले तरी त्यांनी आयुष्यभर जोडलेली माणसे, त्यांनी केलेली लोकसेवा आणि जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान हीच त्यांना खरी आदरांजली आहे. आजही प्रत्येकाच्या मनात नानांच्या आठवणी जिवंत आहेत.
देवाची सेवा करण्यासाठी केवळ पूजा-अर्चा, होमहवन करणे आवश्यक नाही, तर गोरगरीब आणि गरजू लोकांची सेवा करून त्यांची कामे मार्गी लावणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे. नानांनी आपल्या दारी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सर्वतोपरी सहकार्य केले. सर्वसामान्य जनतेची कामे केली आणि माणुसकी जपली. त्यामुळे आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याच्या आणि आठवणींच्या रूपाने ते कायम जनतेच्या मनात जिवंत आहेत, असेही महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.
या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर, मंगळवेढा तसेच परिसरातील विविध भागांतून हजारो नागरिकांनी सरकोली येथे उपस्थित राहून स्व. भारतनाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १3० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपले योगदान दिले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




