Uncategorized

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘निष्पत्ती आधारित शिक्षण’ विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

 श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या, अधिकारप्रदत्त स्वायत्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे दिनांक १३ व १४ जुलै २०२६ रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्यूएसी) वतीने ‘निष्पत्ती आधारित शिक्षण’ (आउटकम बेस्ड एज्युकेशन) या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले.

कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बी. एस. बलवंत उपस्थित होते. प्रारंभी डॉ. नेहा देसाई यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेच्या उद्देश व स्वरूपाविषयी माहिती दिली.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एकूण तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात डॉ. नेहा देसाई यांनी ‘अभ्यासक्रम निष्पत्ती (सीओ), कार्यक्रम निष्पत्ती (पीओ) आणि कार्यक्रम विशिष्ट निष्पत्ती (पीएसओ) यांसाठी आराखडा विधान’ या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात आयक्यूएसी समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी ‘अभ्यासक्रम निष्पत्ती, कार्यक्रम निष्पत्ती आणि कार्यक्रम विशिष्ट निष्पत्ती यांचे परस्परसंबंध निर्धारण (मॅपिंग)’ या विषयाचे सविस्तर विवेचन केले. तर तृतीय सत्रात प्रा. डॉ. आनंद शिंदे यांनी ‘निष्पत्ती प्राप्ती पातळीचे गणन’ (कॅल्क्युलेशन ऑफ लेव्हल ऑफ अटेन्मेंट) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी ‘निष्पत्ती आधारित शिक्षण : परिचय आणि महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. त्यानंतर सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील अभ्यासक्रम निष्पत्ती व कार्यक्रम निष्पत्ती यांचे सादरीकरण केले. या सादरीकरणावर तज्ज्ञांकडून आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस महाविद्यालयातील सुमारे १०० हून अधिक प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोप प्रसंगी सर्व सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य, सर्व उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, आयक्यूएसी समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून डॉ. नेहा देसाई यांनी प्रभावीपणे काम पाहिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close