स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून ऑनलाईन सीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन
बारावी सायन्सचे विद्यार्थी करू शकतात एमएचटी-सीईटी ची ऑनलाईन तयारी

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – ‘स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कडून सोमवार, दि. ०५ जुलै २०२१ पासून ते मंगळवार दि. २० जुलै, २०२१ पर्यंत मोफत ऑनलाईन सीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांवर स्वेरीतील तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले आहे.
शासनाच्या सी.ई.टी. सेलकडून बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा जुलै च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे महाविद्यालये बंद आहेत. त्यातून विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने या मोफत ऑनलाइन सीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी- सीईटी परीक्षेची तयारी कशी करावी? हा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना अनुसरून ‘स्वेरी’ नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत आलेली आहे. अशा उपक्रमांचाच एक भाग म्हणून ‘स्वेरी’ने बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी या मोफत ऑनलाईन क्रॅश कोर्सचे आयोजन केले आहे. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या ऑनलाइन क्रॅश कोर्सच्या माध्यमातून सी.ई.टी. परीक्षेच्या सरावाची संधी मिळणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली. स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने या परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी सीईटी पोर्टल ही सुरू केले आहे. cet.sveri.ac.in या पोर्टलवरील प्रॅक्टिस टेस्टस् ऑनलाईन पद्धतीने सोडवून विद्यार्थ्यांना सराव करता येतो. त्यासाठी विद्यार्थी इंटरनेटशी जोडलेल्या कॉम्प्यूटर, लॅपटॉप तसेच स्मार्ट फोनचा वापर करून देखील हे सराव प्रश्न सोडवू शकतात. बहुतेकदा विद्यार्थ्यांना पेन व पेपरच्या सहाय्याने परीक्षा देणे सवयीचे असते. त्यामुळे कॉम्प्युटरवर ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना ते कठीण जाते. या पोर्टल वरील प्रत्येक प्रश्नसंच सोडवण्यासाठी ठराविक वेळ दिलेली आहे. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्यायाला विद्यार्थी क्लिक करून विद्यार्थी आपले उत्तर निवडू शकतात व याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. टेस्ट सोडवून झाल्यानंतर आपण सोडवलेल्या प्रश्नांची चुकीची व बरोबर उत्तरे यांची पडताळणी देखील विद्यार्थी या सराव पोर्टलद्वारे करू शकतात. तरी, या सुविधेचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. सीईटी परीक्षेच्या विषयांबाबत कांही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी टोल फ्री क्रमांक-८९२९१००६१४ व प्रा. उत्तम अनुसे (मोबा.क्र. ९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.