स्वेरीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने कार्य सुरु – प्राचार्य डॉ.एन.बी.पवार
स्वेरीत राजर्षी शाहू महाराज यांच्या १४७वी जयंती साजरी

छायाचित्र- स्वेरीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अभिवादन करताना मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. बी. पवार सोबत प्रा. आदेश मुळे, रमेश दत्तू, संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा व प्राध्यापक वर्ग.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले. सन १८९४ ते १९२२ पर्यंत कोल्हापूरच्या प्रशासनामध्ये त्यांच्या अदभूत कार्यामुळे त्यांना ‘लोकनेता’ म्हणुन ओळखले जात असे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी धरण बांधले, कुस्ती सारख्या खेळातून खाशाबा जाधव सारखे मल्ल तयार केले. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. वेगळ्या जाती धर्मासाठी त्यांनी वसतिगृहे उभारली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन व मदत केली. त्यांना वेळप्रसंगी टिळकांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. तरीही ‘मानवता धर्म’ हाच विचार त्यांनी पुढे रूढ केला. खऱ्या अर्थाने क्रांतिकारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी कार्य केले. समाजाच्या विकासाचा त्यांचा वारसा आज स्वेरी जपत असल्याचे दिसून येते.’ असे प्रतिपादन मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. बी. पवार यांनी केले.
श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.एन. बी. पवार मार्गदर्शन करत होते. प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या हस्ते झाले. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. पवार म्हणाले की, ‘छत्रपती शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठीच्या विकास कार्यांना गती प्राप्त करून दिली. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून विहिरींची खोदकामे, तलाव, रस्ते, कालवे ही कामे काढली. गरिबांच्या घरी दुष्काळात गरजू साहित्याचे वाटप, अनाथ, अपंग, वृद्ध व निराधार लोकांसाठी अन्नछत्रे देखील काढली. नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि सुखी राहण्यासाठी शाहू महाराजांनी जीवाचे रान करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा देखील काढली. आज स्वेरीकडे पाहिल्यावर छत्रपती शाहू राजांच्या उदात्त कार्याची आठवण येते.’
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘छत्रपती राजश्री शाहू महाराज लहानपणापासून राज घराण्यात वाढले. त्यातूनही त्यांनी गोरगरीब जनतेच्या दुःखावर फुंकर मारण्याचे कार्य सुरूच ठेवले. गरीब व वंचित लोकांचे अश्रू पुसण्याचे कार्य त्यांनी केले. असे मन जाणणारे ते राजे होते. बाराव्या शतकापासूनची समतेची पताका त्यांनी उंचावत ठेवली. संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या अभंगांची प्रचिती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यातून येते. माणसांनी माणसांना जवळ आणण्यासाठी माझा सर्व खजिना खर्च झाला तरी चालेल. अशा मताचे ते राजे होते. माणुसकी कशी जपायची? हे त्यांनी जगाला शिकवून दिले.’ असे सांगून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट उलगडून दाखविला.
यावेळी प्रा. आदेश मुळे, रमेश दत्तू, संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंग अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, प्रा. एम.बी. कुलकर्णी, प्रा.संदीपराज साळुंखे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर,यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.