कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ‘इंडस्ट्री-अकॅडेमिया 2025’ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रिसर्च डेव्हलपमेंट सेल, इंटरनल क्वालिटी इशूरन्स सेल आणि इंटरप्रेनरशिप सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडस्ट्री-अकॅडेमिया 2025′ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या इंव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक प्रा. डॉ. सागर डेळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
यावेळी डॉ. डेळेकर म्हणाले की, ” देशाच्या विकासासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. भारतात सध्या 1,000 हून अधिक विद्यापीठे आणि 65,000 हून अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या शिक्षण व्यवस्थेमध्ये 4.3 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु बेरोजगारीचा दर 46% पेक्षा अधिक आहे. त्यामुळे शिक्षणातून केवळ नोकरी मिळवणाऱ्या मानसिकतेतून बाहेर पडून नवीन संधी निर्माण करण्यावर भर द्यावा लागेल”, असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ‘उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राशी शिक्षण व्यवस्थेचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगताना संजय घोडावत ग्रुप, बालाजी वेफर्स आणि समृद्धी प्लास्टिक या कंपन्यांची उदाहरणे त्यांनी दिली. उद्योगपतींनी शून्यातून सुरुवात करून मोठ्या संधी निर्माण केल्या, त्यामुळेच उद्योग आणि शिक्षण यांच्यातील सहकार्यातून भारताच्या प्रगतीला गती मिळू शकते.’
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे संधींचे नवे द्वार
डॉ. डेळेकर पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्याने बेरोजगारीच्या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना करता येतील. भारत आणि चीनच्या परिस्थितीमध्ये मोठा फरक नाही, परंतु चीनने अधिक वेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे भारताचे ‘विकसित भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राने एकत्र येणे अत्यावश्यक आहे.
‘इंडस्ट्री-अकॅडेमिया 2025’ मध्ये शंभरहून अधिक कंपन्यांचा सहभाग
या ‘इंडस्ट्री-अकॅडेमिया 2025’ मध्ये कृषी, बँकिंग, आयटी, दुग्ध व्यवसाय, बेकरी यांसारख्या विविध क्षेत्रांतील शंभरहून अधिक कंपन्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, उद्योगतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या एकत्रित सहभागाची गरज यावर सखोल चर्चा केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही बाब अधिक महत्त्वाची असून, त्यांच्या वास्तव परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे.”
लोकसंख्यावाढ आणि कृषी क्षेत्राचे महत्त्व
प्राचार्य डॉ. खिलारे पुढे म्हणाले, भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय 35 वर्षे असणार आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने अन्नप्रक्रिया व उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. दूध उत्पादनातही भारत आघाडीवर आहे. मात्र, लोकसंख्या वाढत असताना शेती क्षेत्र कमी होत आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एकाच धान्यात आणि फळांमध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) तयार होऊ शकतील, अशा संशोधनावर भर द्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. समाधान माने केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. धनंजय साठे यांनी करून दिला. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कवडे, डॉ. तुकाराम अनंतकवळस, डॉ. अनिल चोपडे, डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. नेहा देसाई, डॉ. मधुकर अनंतकवळस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग व शिक्षण क्षेत्राने परस्पर सहकार्य वाढवून नव्या संधी शोधण्यावर भर द्यावा, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी रोजगारनिर्मिती व स्टार्टअप्सच्या संधींचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला. यावेळी अनेक कंपन्यानी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनशीप व ऑन दि जॉब ट्रेनिंग देण्याचे कबूल केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी केले. शेवटी डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.