भारतामध्ये अनेक उत्सवांची विशेष परंपरा -प्रा.यशपाल खेडकर
स्वेरीत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम संपन्न

छायाचित्र- स्वेरीत एआयसीटीई यांच्या सूचनेनुसार ‘मकर संक्रांत’ सणाच्या पार्श्वभूमीवर ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा यशपाल खेडकर. सोबत डावीकडून प्रा.वृषाली गोरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी रोहिणी व्यवहारे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, विद्यार्थी प्रतिनिधी गजानन वाघमोडे.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘भारतामध्ये विविध सण उत्सवांची विशेष परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सण-उत्सवांचे इतर राज्यात नेहमीच कौतुक केले जाते. त्याचाच एक भाग असलेल्या ‘मकर संक्रांती’ चा सण महाराष्ट्रात विशेष पद्धतीने साजरा केला जातो. हा सण पौष या मराठी महिन्यात येत असून जानेवारी या इंग्रजी महिन्यात येत असतो. ‘मकर संक्रांत’ हा सण जरी एक असला तरी विविध राज्यात हा सण विविध नावांनी ओळखला जातो व साजरा केला जातो. सामाजिक एकोपा रहावा हाच कालमानानुसार विविध सण साजरे करण्याचा एकमेव हेतू आहे. ‘भोगी’च्या आहारात संस्कृतीचे महत्त्व असून त्याची परंपरा खूप जुनी आहे. जे आपल्या पूर्वजांनी अगोदरच नियोजन करून ठेवले आहे. तिळगुळ देवून हा सण साजरा करतात. त्यातून परिस्थिती जर पाहिली तर या दिवसात शेतकऱ्यांनी घेतलेली पिके काढणीला आलेली असतात. या काळात ज्वारी, ऊस, हरभरा आदी महत्वाची पिके काढणीला येतात. प्रत्येक आनंदात, उत्साहात, सणांमध्ये ऊसाच्या दोन कांड्याचा प्रतीकात्मक रित्या वापर केला जातो. एकूणच भारतामध्ये अनेक सण उत्सवांची विशेष परंपरा आहे. यासाठी सण-उत्सवांची माहिती घेणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात एआयसीटीई च्या सूचनेनुसार स्वेरीमध्ये स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मकर संक्रांत’ या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम संपन्न झाला. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.यशपाल खेडकर यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात विशेष भर पडली. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.यशपाल खेडकर पुढे म्हणाले की, ‘संक्रांतीचे वाण देताना बोर, ऊस, हरभरा व ज्वारी (हुरडा) याचे मिश्रण करून वाण देण्याची प्रथा आहे. ही देखील परंपरा पहिल्यापासून आहे. एकूणच या ‘मकर संक्रांती’चे खूप महत्त्व आहे.’ हे सांगून प्रा. खेडकर यांनी सोलापूरातील सिद्धेश्वर यात्रा, रेवणसिद्धेश्वर मंदिर यांचे इतिहास व महत्त्व सांगितले. याचबरोबर ओरिसा मधील ‘पूर्णान्न’, पंजाब मधील ‘लोरी’ राजस्थानमधील ‘हळदीची भाजी’ या व विविध राज्यातील संक्रांतीच्या निमित्ताने येणाऱ्या सणांवर आणि सणातील पदार्थांवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी अधिष्ठाता व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील सण, उत्सव हे संस्कार आणि संस्कृतीचे प्रतिक असून मकरसंक्रांत या सणाचे विशेष महत्त्व आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये असलेल्या या सणाचे खूप महत्त्व असून खूप साम्य देखील आहे.’ असे सांगितले. कार्यक्रमानंतर शेंगदाणे लाडू व तिळगुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थिनी प्रतिनिधी रोहिणी व्यवहारे, विद्यार्थी प्रतिनिधी गजानन वाघमोडे, प्रा.वृषाली गोरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.