महिलांसाठी सार्वजनिक स्थळी स्वच्छ व निर्जंतुक प्रसाधनगॄहाची नितांत आवश्यकता– अस्मिता प्रशांत

- ©® अस्मिता प्रशांत “पुष्पांजलि”
साहित्यिक, भंडारा
9921096867
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
भंडारा –8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाने 2023 – 24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यामध्ये “महिला सन्मान” नावाच्या या योजनेत शासनाने 50% सवलत अनुदेय केली आहे.
जरी एकीकडे काही महिलांसाठी ही कल्याणकारी योजना असे म्हटले जात असेल, परंतु संपूर्ण महिलांसाठी,
शासनाची ही गिफ्ट, महिलांच्या आरोग्याच्या तुलनेत काहीच कल्याणाची नाही. कारण सध्या “अर्ध्या टिकीटा पेक्षा, महिलांसाठी सार्वजनिक स्थळी स्वच्छ व निर्जंतुक प्रसाधनगॄहाची नितांत आवश्यकता” आहे.
एकीकडे “महिला सन्मान” म्हणून टिकीट कपात केली. पण तेच दुसरी कडे या महिलांना प्रवासात वाॅशरुम ला जायचे असेल, तर बस स्थानकात, रेल्वे स्टेशन मधे ही व्यवस्था विक्रती आहे. म्हणजे महिलांना लघवी लागली अथवा शौचाला जायचे असेल, तर तिला प्रत्येक वेळेस त्याचे शुल्क मोजावे लागते.
हे तर प्रवासी महिलांबद्दल झाले. शहर छोटे असो की मोठे. बसस्थानक म्हटले की आजुबाजुला अनेक छोटे छोटे व्यवसाय करायला हातठेले घेऊन बसलेले व्यावसायिक आलेच. या व्यावसायिकांत बहुतांश महिलांचा देखील समावेश असतो. तासोनंतास या महिला त्या परिसरात बसलेल्या असतात. तसेच असे अनेक गाडेधारक देखील असतात, ज्यांना फक्त गाडा असतो पण त्या सोबत जागेअभावी स्वच्छतागॄहाची सोय नसते. ह्या व्यावसायिक महिला अशाच सार्वजनिक स्वच्छता गॄहाचा वापर करून आपला रोजीरोटीचा व्यवसाय करतात.
प्रवासी महिला असो की बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसरात व्यवसाय करणाऱ्या महिला असो, जेव्हा “महिला सन्मान” म्हटले जाते, म्हणजेच त्यात त्यांच्या या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. महिलांना स्वच्छ व सुरक्षीत प्रसाधन गॄह उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी नाही का? किंवा महिलांसाठी निःशुल्क स्वच्छ व सुरक्षित स्वच्छता गॄहाची व्यवस्था करणे हा महिलांचा खरा “महिलां सन्मान” ठरणार नाही का?
“प्रवास आणि महिलांचे आरोग्य” ही खुप जवळची व एकमेकांशी निगडीत असलेली बाब. म्हणून शासनाने अर्थसंकल्पात टिकीट दरात सुट देण्यापेक्षा, किंवा या सुटीसह सार्वजनिक अथवा खाजगी स्थळी महिलांच्या पाण्यासह स्वच्छता गॄहाची व्यवस्था केली असती, तर त्यातून फक्त महिलांच्या प्राकृतिक गरजाच पुर्ण झाल्या नसत्या, तर यातून महिलांचे आरोग्य ही जपले गेले असते.
कारण, या विधी अधिक कालावधीपर्यंत रोखून धरल्याने, अथवा प्रदूषित जागेचा वापर केल्याने, महिलांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.
बहुतांश महिलांमध्ये होणारे युरीन इन्फेक्शन चे अधिकतर प्रकरणात अस्वच्छ वापरलेले प्रसाधन गॄह व अधिक काळ पर्यंत रोखून ठेवलेली लघुशंका हे महत्वाचे कारण असतात.
एकीकडे शासन “महिला सन्मान” म्हणून प्रवास भाड्यात ५० टक्के सुट देते, तर दुसरी कडे शासकीय कार्यालय, शासकीय दवाखाने, शाळा-कॉलेज व इतर सार्वजनिक ठिकाणी महिलांचे स्वच्छता गॄह व त्यात पाण्याची व्यवस्था याची सोय करणे गरजेचे समजले जात नाही.
आपण जर शाळा अथवा कॉलेजमधे जाऊन पाहिले, तर बऱ्याच ठिकाणी विद्यार्थिनी दिवसभर ज्या शाळा कॉलेज मधे असतात, तिथं स्वच्छता गॄह तर असतात, परंतू तिथे पाण्याची सोय उपलब्ध असत नाही. आणि पाण्याची सोय नाही, म्हणजेच वारंवार तसेच वापरलेले ते ठिकाण जंतूचे माहेर घर. आणि एकतर अशा अस्वच्छ जागेचे वापर करावे लागू नये, म्हणून बऱ्याच मुली दिवसभर जाण्याचे टाळतात.
एकुण म्हणजे अशा अस्वच्छ जागेचा वापर करनेही या मुली व महिलांसाठी घातकच. व दिवसभर जाण्याचे टाळले तरीही त्याचा विपरीत परिणाम त्यांच्याच स्वास्थावर. म्हणजेच इकडे आड तिकडे विहीर.
शासनाचे महिला स्वच्छतागृहां संबंधी स्पष्ट निर्देश असूनही बऱ्याच शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या सोईचे प्रसाधन गॄहाची व्यवस्थाच नसते. कुठे तरी चारभिंती व एका दाराची व्यवस्था असलीही, तरी ती फक्त बांधकाम दाखवण्यापुरती उपयोगाची. कारण तिथं स्वच्छतेसाठी पाण्याच्या उपलब्धतेची व्यवस्थाच केलेली नसते.
आज बऱ्याच कार्यालयात मोठ्या मोठ्या अधिकारी पदावर, महिला अधिकारी कार्यरत आहेत. बऱ्याच शाळा कॉलेज मधे महिला मुख्याध्यापिका आहेत. बऱ्याच आरोग्य खात्यात अनेक महिला अधिकारी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. पण तरीही त्या ठिकाणी महिला व मुलींच्या स्वच्छतागृहा बद्दल उदासिनता दिसून येते.
अशा स्थितीत ८-९ तास काम करणारी महिला कर्मचारी असो, कि ५-६ तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनी मुली असो, की काही वेळेसाठी लाभार्थी म्हणून आलेली एखादी सामान्य महिला असो, ती अशा अस्वच्छ जागेचा वापर करायचे टाळण्यासाठी दोन पर्याय निवडणे, १) दिवसभर पाणी पिणे नको किंवा २) बळजबरी विधी थांबवून धरणे. प्रवासात देखील महिला हेच करतात.
आणि याचा परिणाम अनेक आजारांना आमंत्रण.
किडणी चा आजार असणाऱ्या व्यक्तीला पाणी कमी पिणे व लघुशंका रोकून धरणे दोन्ही घातक. पण नाईलाज असतो.
आणि आश्चर्य म्हणजे महिलांसाठी कार्य करणारे महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग अशा कोणत्याच महत्वाच्या विभागाचे महिलांच्या या समस्येकडे लक्ष जात नाही.
कारण या समस्या सामान्य महिलांच्या आहेत. ए.सी.मधे बसणाऱ्या अधिकारीसाठी असो की पदाधिकारीसाठी असो, स्वतंत्र स्वच्छता गॄह, प्रसाधन गॄह, शौचालय असे सुंदर सुंदर नाव असलेल्या गॄहाची व्यवस्था असते. मग याची समस्या त्यांना कशी जाणवणार?
शासनाने आपल्या राज्यातील महिलांच्या सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छता गॄहाबद्दल असलेल्या या गंभीर स्थितीकडे, फक्त वोट बॅक पुरता विचार न करता, या गंभीर समस्येवर लक्ष दिले, तर खऱ्या अर्थाने “महिला सन्मान” हे फक्त एका योजनेचे नाव ठरणार नाही, तर तो खऱ्या अर्थाने महिला सन्मान ठरेल. व महिलांचा प्रवास सुखकर होऊन, त्यांचे आरोग्यही उत्तम राखले जाईल.