रयत माउली’च्या त्यागामुळे रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरला –प्राचार्य डॉ. सुनील हेळकर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर – “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हाती घेतलेल्या शैक्षणिक कार्यास खत-पाणी घालून वाढविण्याचे कार्य त्यांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी केले. त्याग, निष्ठा आणि समर्पण या
भावनेने केलेले कार्य इतिहास कधीही विसणार नाही. त्यांनी केलेल्या त्यागामुळे रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरला आहे. कर्मवीर अण्णांनी धनीणीच्या बागेत जमविलेल्या मुलांची आई होण्याचे महत्कार्य त्यांनी सेवाभावी वृत्तीने बजावले. म्हणूनच तमाम रयत प्रेमीं त्यांचा ‘रयत माउली’ या शब्दात गौरव करतात.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी, कमवा व शिका योजना समिती आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित ‘रयतमाउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील : जीवन व कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ.
बजरंग शितोळे, उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षक युवराज आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुनील हेळकर पुढे म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील हे बंडखोर आणि पुरोगामी विचाराचे होते. बहुजन समाजाच्या उद्धाराचे व्रत त्यांनी अंगिकारले होते. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला लक्ष्मीवहिनी यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. माहेराहून मिळालेले ८० तोळ्याहून अधिक सोने त्यांनी खर्ची घातले. वसतीगृहातील मुलांची सेवा आणि संगोपन करण्याचे अविरत कार्य त्यांनी जन्मभर केले. त्यांचे विचार आणि कार्य आपण कृतीत आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. लक्ष्मी वहिनींचा त्याग आणि सेवेचा वारसा प्रत्येक रयत सेवकांनी जपला पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे
म्हणाले की, “समाज परिवर्तनाचे काम शिक्षक लोक मोठ्या खुबीने करू शकतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेक आव्हाने स्वीकारून बहुजन उद्धाराचे कार्य केले. महात्मा गांधीना समर्थ साथ देण्याचे काम कस्तुरबा गांधी यांनी केले. तर महात्मा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांनी
सक्रीय सहभाग घेतला. तोच वारसा लक्ष्मीबाई पाटील यांनी सांभाळला. सामाजिक
कार्यात ज्या पुरुषांना त्यांच्या धर्मपत्नीची समर्थ साथ मिळाली त्यांनी समाज परिवर्तनाचे कार्य यशस्वी केले.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी करून दिला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व कमवा आणि शिका योजनेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे
आभार प्रा. डॉ. उमेश साळुंखे यांनी मानले.