डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगाचे महानायक – डॉ. रविराज कांबळे

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर- “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकाचवेळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध आघाड्यांवर त्यांना कार्य करावे लागले. त्यांनी केलेले कार्य ठराविक जाती पुरते मर्यादित नाही तर समस्त भारतीयांसाठी फायद्याचे ठरले आहे. कोलंबिया विद्यापीठाने सर्वात थोर ठरलेल्या त्यांच्या माजी शंभर विद्यार्थ्यांची सूची तयार केली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वोत्तम विद्यार्थी ठरले म्हणून कोलंबिया विद्यापीठाने ज्ञानाचे प्रतिक म्हणून त्यांचा गौरव केला आहे. व्यक्तिगत जीवनात कितीही समस्या आल्या तरी ज्ञानाच्या आणि आत्मशक्तीच्या बळावर त्यावर मात करता येते हा मौलिक सल्ला डॉ. बाबासाहेब यांनी दिला.” असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. रविराज कांबळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती आणि सांस्कृतिक समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ‘’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, डॉ. भगवान नाईकनवरे, डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. अनिल चोपडे, प्रभाकर पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रविराज कांबळे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा समाजधुरीणांनी कार्य केले. अस्पृश्यता उध्दार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुख्य कार्य होते. हिंदू धर्मातील अनिष्ठ चाली,रिती, रूढी आणि परंपरा या दूर केल्या पाहिजेत. अस्पृश्यता हा माणुसकीला लागलेला कलंक आहे. तो नष्ट केला पाहिजे. रक्ताविना क्रांती हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा महत्त्वाचा भाग होता. चवदार तळ्याचा सत्याग्रह ही बाबासाहेबांच्या आंदोलनाची सुरुवात होती. १९२० पासून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने केली. शेवटी भारताच्या भूमित निर्माण झालेल्या बौध्द धर्माची दीक्षा लाखो लोकांना देवून त्यांच्या जीवनाचा उध्दार केला म्हणून डॉ. बाबासाहेब हे युगाचे महानायक ठरतात.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या बळावर स्वत:सह लाखो लोकांच्या जीवनाचा उध्दार आणि विकास केला. दिवसातील १८-१८ तास अभ्यास हा ज्ञान मिळविण्यासाठी केला. डॉ. बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथ संपदा निर्माण केली. ग्रंथाचे वाचन हा त्यांचा गुण आपण अंगिकारला तरी आपल्या संपूर्ण आयुष्याचे कल्याण होईल. आज आपल्या देशासमोर कोणताही प्रश्न निर्माण झाला तर त्यावर उपाय शोधण्यासाठी आपणास देशाचे संविधान उपयोगी पडते. संविधान निर्माण हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण ज्ञानाचा परिपाक आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत समारंभ समितीचे प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुमित साळुंखे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हरिभजन कांबळे, प्रा. सारिका भांगे, प्रा. सारिका केदार, अभिजित जाधव, ओंकार नेहतराव, अमोल माने, समाधान बोंगे, अशोक ओंबासे पुर्वाक्षी लोंढे, गायत्री कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी मानले.