दोन दिवसात संपुर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न – मुख्याधिकारी, डॉ.प्रशांत जाधव
कार्तिकी यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग स्वच्छतेसाठी १३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती...

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर दि.२४ – पंढरपूर शहरामध्ये दि.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला. कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होता. या यात्रा कालावधीत सुमारे ४ ते ५ लाख वारकरी-भाविक दर्शनासाठी आले होते. या येणाऱ्या भाविकांना आवश्यकच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहिम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली.
कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते. यामध्ये प्रमुख्याने ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांची संख्या जास्त असल्याने वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात नसल्याने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासुनच २४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असुन याकामी शहरासह ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी १३०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये ३५० कायम तर ९५० हंगामी कर्मचारी तसेच इतर नगर पालिकेकडून ही स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करुन घेण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तसेच ४१ घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ४ टिपर, २ कॉम्पॅक्टर, १ डंपरप्लेसर, ४ डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज ७० ते १०० टन कचरा उचलण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी यावेळी केले आहे.
यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.