Uncategorized

पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिरात सव्वा लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ

||आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी||

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर, २४ नोव्हेंबर – कार्तिकी वारीनिमित्त दि. २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर येथील ६५ एकर परिसरामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरामध्ये सव्वा लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आरोग्य मंत्री डॉ.  तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे दि. २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला वारकरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरांमध्ये वारकऱ्यांना विविध रोगांवर मोफत उपचार आणि आरोग्य सेवा पुरविण्यात आली.

या शिबिरासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टर, तज्ज्ञ, तंत्रज्ञ, परिचारिका व कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यासह सुमारे ३००० मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले होते. रुग्णांच्या सुविधेसाठी १०८ क्रमांकाच्या ७ रुग्णवाहिका ६५ एकर परिसर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर आणि इतर ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे सहा ठिकाणी अतिदक्षता विभाग, तीन हिंदुदृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ११ प्राथमिक उपचार केंद्रे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्य या महाआरोग्य शिबिरात भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत घेण्यात आली होती.

या महाशिबिरातून नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, हाडांची तपासणी, ईसीजी व सोनोग्राफी तपासणी, रक्त तपासणी, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कॅन्सर यांसारख्या रोगांवर मोफत उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या महाआरोग्य शिबिरासाठी भैरवनाथ शुगर्स व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वयंसेवकांचे सक्रिय योगदान लाभले.

 

शिबिराची काही ठळक वैशिष्ट्ये –

या महाआरोग्य शिबिरामध्ये डेंटल व्हॅनमध्ये एकूण २७४ रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

फिरता दवाखान्यामध्ये एक्स रे, रक्ताच्या चाचण्या आदी सुविधांचा एकूण २४६ रुग्णांनी लाभ घेतला. 

 नेत्र विभागामध्ये एकूण १८,६३७ मोफत नेत्र तपासणी करण्यात आलेली असून, १५,४९६ मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 

मोतीबिंदु निदान झालेल्या ६६१ रुग्णांची यादी करून त्यांच्यावर शासकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

– शिबिराच्या ठिकाणी ०५ बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत होता. त्यामध्ये ६६ रुग्णांना सेवा देऊन वारकऱ्यांचे प्राण वाचविण्यात आले.

आरोग्य दूतामार्फत गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याद्वारे एकूण १८८०१ रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्यात आली. 

महाआरोग्य शिबिरासाठी EMS 108 च्या ०३ रुग्णवाहिका प्रशिक्षित मनुष्यबळासह सज्ज होत्या. त्याद्वारे एकूण २८६१ रुग्णांना सेवा देण्यात आली. 

– शिबिरामध्ये अवयव दान आणि नेत्रदान याबाबत एकूण ५७ जणांना माहिती व समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी अवयव दान ३, नेत्रदान २, देहदान १ यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. 

 

उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची महाआरोग्य शिबिराला भेट

केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून, आरोग्याविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

 

पंढरपूर येथील ६५ एकर परिसरात कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिराला उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.

.उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरिता ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून १४ वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व्यवस्था करण्यात येत आहे.

आषाढी यात्रेत आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ११ लाख ६४ हजार भाविकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले होते. त्याची नोंद जागतिक बुक रेकॉर्डमध्ये झाली होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close