Uncategorized

हरहुन्नरी बहुआयामी क्रियाशील व्यक्तिमत्व : विजयकुमार कांबळे

61व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर घेतलेला आढावा...

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-
शासकीय नोकरीत असूनही सामाजिक कार्यात कृतिशिल असणारे कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1962 रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव वांगी (ता. उत्तर सोलापूर) हे होय. विजयकुमार यांचे आई-वडिल अशिक्षित होते. आई ताराबाई व वडिल गोविंद हे चाकूला धार लावणे, त्याचबरोबर आठवडी बाजार, यात्रा, वारीमध्ये सुरी, कात्री, अडकित्ते, खुरपी याची विक्री करून उपजिविका करीत. त्यांना एकूण सहा मुली व तीन मुले होती. अशिक्षित असूनही त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. त्यामुळे त्यांनी तिन्ही मुले पदवीधर बनविली. तीन मुली शिक्षिका, एक मुलगी पोलीस उपनिरीक्षक व इतर पदवीधर बनविल्या. सर्वांचे विवाह केले.
विजयकुमार यांचे प्राथमिक शिक्षण न्यू बुधवारपेठ सोलापूर येथील श्राविका हायस्कूलमध्ये झाले. पाचवी ते सातवी जैन गुरूकूल येथे तर आठवी ते दहावी वडाळा येथे पूर्ण केले. पदवीचे शिक्षण पुणे येथे तर एमए एम एस डब्ल्यू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथे आरोग्य निरीक्षक या पदाचा अभ्यास कोर्स पूर्ण केला. 1986 साली सोलापूर महानगरपालिका येथे त्यांना आरोग्य निरीक्षक म्हणून नोकरी मिळाली व ते आरोग्य सेवेत रूजू झाले.

पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे वतीने बार्टी कार्यालयासमोर धरणे आंदोलन प्रसंगी  भूमिका मांडताना विजयकुमार  कांबळे यावेळी माजी आमदार रमेश बागवे, जेष्ठ विचारवंत रमेश राक्षे व इतर 

न्यू बुधवारपेठ हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र होते. विद्यार्थी दशेतील काळ त्यांचा येथेच गेला. यावेळी दिवंगत एस. आर. गायकवाड, राजा इंगळे, राजा सरवदे, सिद्राम सोनकांबळे हे चळवळीत अग्रेसर होते. त्यांच्या प्रेरणेने विजयकुमार आंबेडकरी चळवळीशी जोडले गेले. याचवेळेस डॉ. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनमध्ये त्यांनी काम सुरू केले. दमानी सभागृह येथे राज्यव्यापी विद्यार्थी परिषद संपन्न झाली. दिवंगत संजय गायकवाड, राजा इंगळे यांनी नेतृत्व केले.
पुणे येथे असताना मातंग समाजातील नेते दिवंगत मोहन वाघमारे, दिवंगत मोहन ननवरे, रमेश राक्षे व दलित स्वयंसंघाशी त्यांचा संबंध आला. पुढे 132 पर्वती पायथा येथे दिवंगत दशरथ कदम, दिवंगत डी. के. रणदिवे, दिवंगत बापूसाहेब पाटोळे, दिवंगत मंगलदास पवार, दिवंगत मच्छिंद्र कसबे, सोपान चव्हाण, दादासाहेब सोनवणे या चळवळीतील जहाल कार्यकर्त्यांशी भेट झाली.

रोटरी क्लब पुणे चे सेक्रेटरी पद ग्रहण करताना विजयकुमार कांबळे 

नोकरी व सामाजिक चळवळीत काम करत असतानाच 1987 सााली त्यांचे गोविंद चव्हाण, मसले यांची कन्या संगीतासोबत विवाह झाला. एक मुलगा व तीन मुली झाल्या. मुलगी शितल पारखे मुकबधिर अभ्यासक्रमातून बी. ए. बीएड झाली. तर सोनल पारखे ही इंजिनिअर झाली. तिसरी मुलगी सृष्टी ही पुणे येथे विमान व्यवस्थापनाचा कोर्स करीत आहे. मुलगा शांतीसागर हा बी.ए. समाजशास्त्र डी.एच. एल. एस. एमएस डब्ल्यू, पीजीसीसी इन जनरल स्टडीज्, पीजीडी, सीएसआर, डीपी अँड एसआय, एम.ए. इन पाली इत्यादी पदव्या घेतल्या आहेत.
सध्या पुणे येथे एका चांगल्या आंतरराष्ट्रीय कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत आहे. शांतीसागर याचा विवाह सत्यशोधक पद्धतीने पार पडला आहे. विजयकुमार यांचे आई-वडिल अशिक्षित असले तरी त्यांनी शिक्षण देऊन सक्षम बनविले. याची दखल घेऊन वडिल गोविंद यांना भीम प्रतिष्ठान या संस्थेने ‘आदर्श पालक’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मान केला.
आई ताराबाई यांना ‘यशदा’ या संस्थेचा 31 डिसेंबर 2014 रोजी ‘आदर्श माता’ म्हणून पुरस्कार मिळाला. कास्ट्राईब संघटनेच्या वतीने 10 जानेवारी 2020 रोजी सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केले. 8 मार्च 2020 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वडिल गोविंद यांचे 15 फेब्रुवारी 2008 साली निधन झाले. तर आई ताराबाई यांचे 9 मे 2020 रोजी निधन झाले.
विजयकुमार यांच्याकडे दलित स्वयंसेवक संघाचे राज्य सरचिटणीस म्हणून पद होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली. यामध्ये प्रामुख्याने अनिता बसवंते बलात्कार व खून प्रकरण, सिकंदर टाकळी येथील मातंग वस्ती जळीत प्रकरण, बार्शी येथे झालेल्या अमोल कसबेे खून प्रकरण याबाबत त्यांनी तीव्र आंदोलने केली. आरएसएसचा निषेध व मनु:स्मृतीचा धिक्कार म्हणून मनुची प्रतिकृती बनवून सोलापूर येथील मेकॅनिकल चौकात दहन केले. दलित स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मातंग समाजात असणारी अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, वाघ्या मुरळी, पोतराज प्रथा निर्मुलन करण्याचा प्रयत्न त्यांनी युद्ध पातळीवर केला. त्यासाठी सातत्याने प्रबोधन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे यासाठी नामांतर चळवळीने जोर धरला होता. त्यावेळी विजयकुमार कांबळे यांनी सक्रिय भाग घेतला. आझाद मैदान मुंबई येथे 1982 रोजी पँथर नेते रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे, बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले होते. यावेळी दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने संघटना प्रमुख मोहन वाघमारे, मोहन ननवरे यांच्यासह विजयकुमार कांबळे व प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सर्व सत्यागृहींना पोलिसांनी अटक केली व 22 दिवस सेंट्रल जेल ठाणे येथे सर्वांना ठेवण्यात आले. यावेळी जेलमध्ये बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, प्रा. अरूण कांबळे, काँ. शरद पाटील, पार्थ पोळके, लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, प्रा. देसर्डा, नरेंद्र दाभोळकर, अनिल अवचट, हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गज जेलमध्ये होते. जेलमध्ये भाषणे होत. उपोषणे होत. त्याचा विजयकुमार यांना अगदी जवळून अनुभव आला. 22 दिवसानंतर सर्वांची सुटका झाली. वैराग येथील सुशिला निंबाळकर या मातंग महिलेवरील अत्याचार तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना घेराव घालणे, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न करणे अशी अनेक आंदोलने विजयकुमार यांनी केली. समता सैनिक दलाचे जनरल कमांडींग ऑफिसर म्हणून त्यांनी कार्य केले. सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात पथनाट्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ‘विद्रोही भारत’ हे पथनाट्य त्यांनी सादर केले होते.
महानगरपालिकेत सेवेत असताना त्यांनी कामगार कृती संघटनेची 25 वर्षे कार्याध्यक्ष म्हणून काम केले. 572/572 कामगार सेवेत रूजू करण्यासाठी त्यांनी आंदोलन केले व त्यांना यश आले. अनेक दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता मिळावा. त्याचप्रमाणे वारांगणांना मेडिकल बेनिफिट मिळाला. त्यांची वारंवार तपासणी व्हावी, यासाठी त्यांनी मेळावे घेतले. क्रांतीवीर लहुजी वस्ताद, मातंग अभ्यास आयोगाचे अध्यक्ष बाबुराव बारसकर यांनी सोलापुरातून विजयकुमार कांबळे व प्रा. दिगंबर झोंबाडे यांची निवड केली.
त्यांनी केलेल्या या कार्यामुळे त्यांना 2002 साली महानगरपालिकेने ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार दिला. 2007 साली ज्ञानज्योती मुक्ता साळवे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार पुणे’, 2008 साली पुणे येथे मोहन वाघमारे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘सामाजिक पुरस्कार’, 2009 साली केरू जाधव मंचच्या वतीने ‘भीम सैनिक सामाजिक पुरस्कार’, सोलापूर येथे मिळाला. तर 2011 सालाी आण्णाभाऊ साठे विकास परिषद बार्शी यांच्या वतीने सामाजिक कार्याचा पुरस्कार मिळाला. 2012 साली सोलापूर महानगरपालिकेचा ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार मिळाला. 2014 साली अशोक कामटे विचार मंचचा ‘बेस्ट सोलापूरकर’ पुरस्कार मिळाला. 2018 साली क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना यांचा ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार मिळाला. 2020 साली कोरोना योद्धा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. 34 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी म्हणून ते 2020 साली सेवानिवृत्त झाले.

सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले असून  दलित स्वयंसेवक संघांचे राज्य कार्याध्यक्ष  पद भूषवीत आहेत. तसेच रोटरी  क्लब चे पुणे चे सेक्रेटरी  म्हणुन निवड झाली आहें.आजही मोठ्या तडफेने ते काम करीत आहेत.  अशा या हरहुन्नरी, सदाबहार, कर्तृत्ववान कार्यकर्त्यास सहकारी मित्रास त्यांच्या 61व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
–                                                 — संकलन : श्रीकांत कसबे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close