प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी या बळावर यश संपादन करता येते.’ – प्रिं. डॉ. शिवलिंग मेणकुदळे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर – “सध्याचे जागतिकीकरणाचे युग हे स्पर्धेचे आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी जेवढी शिक्षकांची आहे; तेवढीच शिक्षण घेण्याची जबाबदारी ही
विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:मधील क्षमता ओळखून त्या
विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर ध्येय निश्चितपणे साध्य करता येते. ज्ञानाची केंद्रे ही आपल्या सभोवती असतात. त्यातून ज्ञानाचे कण जमवून समाजात पोहचविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी या बळावर यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी आपल्यामधील शक्तीचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेणकुदळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण
संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य तथा सुप्रसिद्ध उद्योजक महादेवबापू बाड हे होते. यावेळी मंचावर सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, जनरल बॉडी सदस्य सुभाषआबा सोनवणे, अमरजीत पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, जे. बी.
भायगुडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य
डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य
आप्पासाहेब पाटील, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, कनिष्ठ विभागाचे
उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षक युवराज आवताडे, क्रीडा शिक्षक विठ्ठल फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रिं. डॉ. शिवलिंग मेणकुदळे पुढे म्हणाले की,
“महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या शेवटच्या मुलापर्यंत जोवर शिक्षण पोहचत नाही. तोवर मी शिरस्त्राण आणि पायताण वापरणार नाही, असा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेला संकल्प आज मूर्त रुपात अवतरताना दिसतो आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज बहुजन समाजाची मुले आणि मुली नेतृत्त्व करताना दिसतात. युवकांच्या मध्ये प्रचंड ताकद आणि ऊर्जा असते. ती विधायक
कार्यासाठी वापरली गेली पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात महादेवबापू बाड म्हणाले की,
“विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवून गुलाम बनण्यापेक्षा व्यवसाय करून मालक बनले पाहिजे. ज्ञान मिळविण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे आणि अनुभव घेण्यासाठी व्यवसाय केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात वाचन केले पाहिजे. वाचनातून ज्ञान, माहिती, प्रेरणा मिळते. पुस्तकासोबत माणसे वाचता आली. तर आपले जगणे सोपे होते. विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. चार भिंतींच्या पलीकडे जावून शिकायला पाहिजे. जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्यास शिकले पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रोफे.
डॉ. बजरंग शितोळे यांनी करून दिला. या कार्यक्रमात क्रीडा विभाग, विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धा, पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी, सांस्कृतिक विभाग, पुरस्कार प्राप्त शिक्षक, विद्यापीठात विविध आस्थापनात निवड झालेले शिक्षक, अभ्यास मंडळावर निवडून
आलेले प्राध्यापक, राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्त्व केलेले राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षणार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेतील आदर्श स्वयंसेवक, युवा महोत्सवात यशस्वी झालेले विद्यार्थी अशा सर्वांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात वार्षिक अहवाल
वाचन डॉ. सचिन येलभर यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी
विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.
डॉ. अमर कांबळे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. सचिन येलभर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.