Uncategorized

कवितेने आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावे — प्रा.डॉ. रामदास नाईकनवरे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सांगली:-कविता ही उस्फुर्त भावनेचा अविष्कार जरी असली तरी, त्या भावनेला ‘स्व’ अस्तित्वात भान असावे. अलीकडच्या काळामध्ये ज्येष्ठ साहित्यिकांच्या अंतर्गत गटा-तटांच्या वर्तुळामध्ये नवोदित कवींची घुसमट होता दिसते. त्यामुळे आपापल्या गटातटातील ज्येष्ठांची मर्जी संभाळण्यामध्येच नवोदित कवींची दमछाक होते. त्यांना त्यांच्या स्वतंत्र बुद्धीने, स्वतंत्र अस्तित्वाच्या जाणीवने वाढू दिले तरच, नवोदित कवींची कविता आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करेल. असे स्पष्ट मत कवी संमेलनाचे अध्यक्ष, मराठी साहित्याचे अभ्यास प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त, विटा येथे दि.२ रोजी राधा रामा कृष्णा बापट मुक्तांगण वाचनालयातील 36 वा वर्धापन दिन व कवी संमेलन आयोजन प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. रामदास नाईकनवरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये माणदेशी कवींच्या कविता संदर्भातील काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. सर्वप्रथम कविता ही आपल्या वैयक्तिक, सामाजिक व सांस्कृतिक जगण्याशी प्रामाणिक असावी. तिला तिची एक स्वतंत्र अशी वैचारिक भूमिका असावी. प्रत्येक कवीची कविता ही एक समान जाणिवेची असू शकत नाही. प्रत्येक कवीचं सामाजिक व सांस्कृतिक संचित हे अभिव्यक्तीच्या संदर्भात वेगळे रूप धारण करू शकते. परंतु, ज्येष्ठांच्या गटातटात व वर्तुळात अडकलेली माणदेशी कविता ही अपवाद वगळता स्वतःचं ‘स्वत्व’ हरवून बसलेली दिसत आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त करून आत्मटिकेच्या जाणिवेतून सामाजिक आत्मभान आलेली कविताच नवोदित कवींचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कवी संमेलनाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक व या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक रघुराज मिटकरी यांनी केले. याप्रसंगी, मंचावर एड. सुभाष पाटील, ज्येष्ठ साहित्यिक आनंदराव पाटील, कविवर्य व कथाकार प्रा. विश्वनाथ गायकवाड, उत्तमराव चौथे उपस्थित होते.
या कवी संमेलनामध्ये बालकवी श्रीवर्धन मिटकरी यांनी आपली कविता सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कथाकार व कवीवर्य सुनील दबडे, गझलकार सुधीर इनामदार व सिरज शिकलगार यांच्या गझलांना रसिक प्रेक्षकांकडून खूपच दाद मिळाली. सामाजिक आत्मभान असणारे कवी प्रा. संताजी देशमुख यांच्या ‘झुंज घे मानवा परवा नको कोणाची’ या कवितेने प्रेक्षकांना चिंतनशील बनवले. तर कवी अशोक पवार यांनी आपली गेयचना सादर केली. याच कार्यक्रमांमध्ये आटपाडीचे शाहीर हरिभाऊ गळवे यांनी आपल्या शाहिरीतून वर्तमान राजकीय जीवनावर व्यंगात्मक प्रकाशझोत टाकला.
एड. सुभाष पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड , कवी एम. बी. जमादार , अरविंद चांडवले, सागर गोतपागर, रानकवी सुधो मोहिते, अनिल पाटील बोरगावकर, रत्नकुमार नरूले, गणेश जाधव, निवांत कवळे, सौ. वृषाली कुलकर्णी, शैलजा भिंगारदिवे, यांच्या कवितांना रसिकांनी भरभरून दिली.
याप्रसंगी डॉ. प्रकाश जाधव, यांनी गदिमांच्या आठवणी सांगितल्या. तर उत्तमराव चौथे यांनी आपल्या आठवणी सांगून जुना काळ उभा केला. प्रकाश कदम, योगेश्वर मिटकरी, अभिजीत निरगुडे,. तात्यासाहेब शेंडगे, राजू गारोळे, डॉ. ऋषिकेश मेटकरी, सौ. वैशाली कोळेकर, सौ. वंदना तामखेडे , सौ. सुनीता पवार, इत्यादी रसिक व वाचक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. शेवटी अरुण लंगोटे यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close