नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी शिक्षकांनी सज्ज झाले पाहिजे. – प्रिं. डॉ.प्रमोद पाब्रेकर

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे वरिष्ठ सल्लागार प्राचार्य डॉ प्रमोद पाब्रेकर मार्गदर्शन करताना…
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – “रयत शिक्षण संस्था ही अतिशय नावाजलेली व गुणवत्ता पूर्ण
शिक्षण देणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.
रयतने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांच्या अनेक
महाविद्यालयांनी ए+ मूल्यांकन प्राप्त केले आहे. भारत सरकारचे नवीन
शैक्षणिक धोरण लवकरच येत असून या धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील. अनुदानित, विनानुदानित या संकल्पना आता कालबाह्य ठरणार असून नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी शिक्षकांनी सज्ज झाले पाहिजे.”असे प्रतिपादन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे वरिष्ठ सल्लागार प्रिं. डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात ‘शिक्षक दिना’निमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिं. डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, समारंभ समितीचे चेअरमन डॉ. दत्तात्रय डांगे, पर्यवेक्षक प्रा. युवराज अवताडे, व्होकेशनल विभाग प्रमुख प्रा. दिलीप बाबर हे होते.
प्रिं. डॉ. प्रमोद पाब्रेकर पुढे म्हणाले की, “ग्रामीण, शहरी असा
कोणताही भेदाभेद यापुढे शिक्षण क्षेत्रात असणार नाही. विद्यार्थी हा
शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्यामुळे यापुढे कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल. शिक्षक हा कायमस्वरूपी विद्यार्थी असतो. त्यामुळे त्याने नवनवीन कौशल्ये सातत्याने अंगिकारली पाहिजेत. शैक्षणिक क्षेत्रातील बदल शिक्षकांनी आत्मसात केले पाहिजे. या राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचा वाटा बहुमोल आहे. हे शिक्षकांनी कायम स्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “शिक्षक
हा आयुष्यभर शिकत असतो. शिक्षणातून संस्कार देता आले पाहिजेत. त्यासाठी फार मोठ्या ज्ञानाची गरज नसते. निसर्ग आणि भोवतालचा परिसर आपणास बऱ्याच
गोष्टी शिकवत असतात. मुंग्यांनी बनविलेल्या वारुळातून नैसर्गिक
वातानुकुलीत घरांची संकल्पना पुढे आली. मधमाशापासून एकजूट, चिकाटी, कामावरती निष्ठा याबाबी शिकता येतात. तर चिमणीने एक एक काडी जमवून तिने बनविलेल्या घरट्यातून संस्कार दिसतात. अशाच स्वरूपाचे संस्कार शिक्षण देत
असताना विद्यार्थ्यांवर करायला हवेत. ”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग
प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला. या कार्यक्रमात प्रमुख
मान्यवरांच्या हस्ते ‘कर्मवीर’ या वार्षिक अंकांचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प
देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रघुनाथ
पवार यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार युवा महोत्सव समितीचे चेअरमन डॉ. प्रशांत नलावडे यांनी मानले.