समाजाच्या गरजा लक्षात घेऊन उद्योगांची उभारणी करणे आवश्यक -केएलईचे डॉ.नितीन कुलकर्णी
स्वेरीत ‘डिझाईन थिंकिंग अँड इंटरप्रेन्यूअल पेडागॉगी’ या कार्यशाळेचे उदघाटन

छायाचित्र- स्वेरीमध्ये ‘डिझाईन थिंकिंग अँड इंटरप्रेन्यूअल पेडागॉगी’ या विषयावर स्वेरी आणि सोबस यांच्यामार्फत एक आठवड्याच्या कार्यशाळेचे उदघाटन करताना केएलई सेंटर ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन अँड इंटरप्रेनरशिप (सी.टी.आय.ई.) चे माजी संचालक डॉ. नितीन कुलकर्णी सोबत डॉली पारीख, दिपक मेनन, दिग्विजय चौधरी, रेषा पटेल, डॉ.प्रशांत पवार, डॉ. आर. आर. गिड्डे आदी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर-‘सध्या अस्तित्वात असणारे सर्व उद्योग हे लोकांच्या म्हणजेच ग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन उभा करण्यात आलेले आहेत. आज भारतात समस्यांची कमतरता नाही. ही आपल्या दृष्टीने एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी व्यावहारिक समस्यांची हाताळणी करायला शिकले पाहिजे आणि त्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून पदवी संपादन न करता तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेत असताना आपला कौशल्य विकास केला पाहिजे. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचा वेळ घेणे सहज शक्य आहे. पूर्वी एक काळ असा होता कि विद्यार्थ्यांना शिक्षकांसमोर जाणे आणि त्यांचा वेळ घेणे हे सहज शक्य नव्हते. विद्यार्थ्यांनी नव-नवीन कल्पनांना वाव दिला पाहिजे आणि आपल्या विचारांवर ठाम राहिले पाहिजे. आपल्या समाजातल्या स्थानिक लोकांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन उद्योगांची उभारणी करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन केएलई सेंटर ऑफ टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन अँड इंटरप्रेनरशिप (सी.टी.आय.ई.) चे माजी संचालक डॉ. नितीन कुलकर्णी यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली ‘डिझाईन थिंकिंग अँड इंटरप्रेन्यूअल पेडागॉगी’ या विषयावर आयोजिलेल्या एक आठवडा भर चालणाऱ्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी हुबळी येथील केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. नितीन कुलकर्णी हे मार्गदर्शन करत होते. कोरोना प्रकोपानंतर प्रथमच स्वेरीतील वातानुकुलीत असलेला आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल विद्यार्थ्यांनी पूर्णपणे भरलेला होता. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी प्रास्ताविकात ‘कार्यशाळेचा हेतू सांगून सोबस म्हणजे नेमके काय, सोबसचे कार्य, संशोधनाचा विस्तार आदी बाबत सांगून सोबस सोबत झालेला करार आणि या करारातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच निती आयोगा मधील अटल इन्होवेशन, स्वेरीची शिक्षण संस्कृती तसेच उद्योग-व्यापार या बाबतीत माहिती दिली. स्टार्टअपचे काम करताना केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नसून त्याला प्रात्यक्षिकाची जोड द्यावी लागते. यासाठी मिळालेला जवळपास रु.नऊ कोटी रुपये पर्यंतचा संशोधन निधी याबाबत माहिती दिली. प्रा.यशपाल खेडकर यांनी ‘स्वेरीची शैक्षणिक प्रगती, करार आणि संशोधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली ओळख याची सविस्तर माहिती दिली.‘सोबस इन्साईटस् फोरम’चे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी म्हणाले की ‘आपल्याकडे कच्चामाल आहे, तंत्रज्ञान आहे, गुणवत्ता आहे संकल्पना देखील आहे परंतु सोबतीला या सर्व बाबी हाताळण्याच्या संकल्पनांची गरज आहे. आपल्यातील अनुभव व ज्ञानाचा वापर उत्तम पद्धतीने केल्यास कोणताही व्यवसाय व उद्योग यशस्वी होतो, उद्योगामध्ये भरभराटी येते. पुर्वी परदेशातील नागरिक आपल्या देशातील कच्चामाल घेऊन त्यावर प्रक्रिया करून पुन्हा तोच पक्का माल म्हणून आपल्या देशात विकत असत. हीच गुणवत्ता आपण आपल्या देशात वाढीस न्यायची आहे. स्वेरीबरोबर सोबसचा करार स्थापित झाला आहे. एकूणच इंजिनिअरिंग नंतर आपण दुसरीकडे कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा दुसरे आपल्याकडे कसे नोकरी करू शकतील असा उद्योगधंदा निर्माण करण्याची सध्या गरज आहे.’ पुढे बोलताना मा.कुलकर्णी म्हणाले की, ‘व्यवसाय उद्योगांमध्ये संकल्पना या महत्त्वाच्या असून शिक्षण व अनुभव यापासून व्यवसायात अधिक वृद्धी होत असते त्यामुळे निर्णय, नेतृत्व याचबरोबर परिश्रम देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मुख्य मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची डॉ. कुलकर्णी यांनी उत्तरे दिली. या कार्यशाळेसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यशाळेसाठी आलेले पाहुणे व विद्यार्थी यांच्या भोजनाची व राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून यासाठी स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील हे परिश्रम घेत आहेत. यावेळी सिलिकॉन व्हॅली येथील डिझाईन स्टुडीओ अँड पार्टनरच्या डॉली पारीख, वर्क वाईजचे इंटरप्रेनर कोच आणि संस्थापक दिपक मेनन, सोबसचे संचालक रेषा पटेल, गिरीष संपत, आकांक्षा सिन्हा, ईशान पंत तसेच स्वेरीतील संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, डॉ. व्ही. एस. क्षीरसागर यांच्यासह स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित आहेत.