देशाच्या प्रगतीमध्ये आण्विक उर्जेचा मोलाचा वाटा – डॉ. एस. मुरली
किरणोत्सर्ग तंत्रज्ञानाचे फायदे व भारतीय आण्विक ऊर्जा धोरण’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यक्त केले विचार

कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. एस. मुरली आय.ए.आर. पी., भाभा आटोमिक रिसर्च सेंटर मुंबई., सोबत व्यासपीठावर – डॉ. संजय पाटील, डॉ. रेजराम मीना, प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – आण्विक ऊर्जा ही देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे. या उर्जेच्या वापराने मेडिकल, संरक्षण, कृषी आदी क्षेत्रात फायदे होणार असून याच्या वापराविषयी अधिक संशोधन सुरु आहे. आण्विक ऊर्जा ही देशाची गरज असून याविषयी असणरे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. मुरली यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात बॅरि. पी. जी. पाटील सभागृहात पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र विभाग व भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या इंडियन असोशिएशन फॉर रेडीएशन प्रोटेक्शन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किरणोत्सर्ग तंत्रज्ञानाचे फायदे व भारतीय आण्विक ऊर्जा धोरण’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते.
डॉ. एस. मुरली पुढे म्हणाले की, “आण्विक ऊर्जा किरणोत्सर्गाचा नियंत्रित वापर हा मानवी कल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. गेल्या सहा दशकात भारतामध्ये आण्विक उर्जेची कोणतीही दुर्घटना घडली नाही. किरणोत्सर्गाबाबतचे सामान्य लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर झाले तर आण्विक उर्जेच्या प्रकल्पांना पाठींबा मिळेल. लोकांमध्ये जागृती करणे ही बाब फार महत्त्वाची आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “आण्विक क्षेत्र हे देशातील महत्त्वाचे क्षेत्र असून विद्यार्थ्यांचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील करिअरच्या संधीविषयी जागृती लक्षात घेवून प्रयत्न करावेत.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत उपप्राचार्य डॉ. लतिका बागल यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. या कार्यशाळेस डॉ. रुपाली करपे व डॉ. तेजराम मीना यांनीही आण्विक शास्त्रातील मुलभूत संकल्पना आणि रेडीएशन डिटेक्टर बद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य प्रोफे. डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ झांबरे, सोमनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे डॉ. संजय पाटील व महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षकेतर सेवक आदींचे सहकार्य लाभले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. अनिल चोपडे यांनी मानले.





