वाखरी येथे स्व: सुधाकरपंत परिचारक यांची पुण्यतिथी धार्मिक व सामाजिक उपक्रमाने साजरी


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्यातून समाजासाठी निर्माण केलेली संपत्ती, संस्कार आणि केलेली सेवा हीच त्यांची खरी श्रीमंती असते. अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या चरणी सेवा रुजू करण्याची संधी मिळणे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करणे ही आपल्यासाठी भाग्याची बाब असल्याचे भावोद्गार ह. भ. प. जगन्नाथ महाराज देशमुख यांनी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त काढले.

पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, पांडुरंग परिवाराचे नेते तथा माजी आमदार श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वाखरी येथील कर्मयोगी प्रशासकीय भवन येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांचे भक्तिमय कीर्तन संपन्न झाले.
यावेळी कीर्तनातून जगन्नाथ महाराज यांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, सहकार, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.
कीर्तनादरम्यान ह.भ.प. जगनाथ महाराज देशमुख यांनी संतपरंपरा, भक्ती, नामस्मरण, सदाचार आणि समाजसेवेचे महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संतांच्या विचारांचा समाजजीवनावर होणारा सकारात्मक परिणाम तसेच माणसाने समाजाप्रती आपली जबाबदारी कशी पार पाडावी, याबाबत त्यांनी विविध उदाहरणांतून मार्गदर्शन केले. अभंग, भजन आणि हरिनामाच्या जयघोषामुळे कारखाना परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
यावेळी सामाजिक भान जपत कारखान्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पांडुरंग परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते व कारखान्याचे कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान केले.
यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी आयुष्यभर समाजातील सर्व घटकांसाठी प्रामाणिकपणे काम केले. सहकार, शिक्षण, सामाजिक कार्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.



