नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि सोलापूर आणि संत कबीर बहुउद्देशीय समाज सेवा मंडळ यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
सोलापूर :-नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर व संत कबीर बहुउद्देशीय समाजसेवा मंडळ सोलापूर या दोन्ही संस्थाची वार्षिक सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज शनिवार दिनांक 12/9/2026 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत पार पडली.सुरुवातीस नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष व संचालकांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
कार्यक्रम दोन सत्रात पार पडले.पहिल्या सत्रात संत कबीर बहुउद्देशीय समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एम डी.शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.श्री शाम शिंगे यांनी प्रास्ताविक केले.संत कबीर बहुउद्देशीय समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ एम डी शिंदे सर यांनी बचत गटांचा अहवाल सादर केला.सोलापूर शहरात 42 बचत समुह स्थापन करण्यात आले आहेत.या बचत गटांची 31 मार्च 2026 पर्यंत जवळपास 98 लाख इतकी वर्गणी जमा झाली आहे.या गटांनी 92 लाख रुपये इतके कर्ज आपल्या सभासदांना कर्ज वितरण केले आहे. या बचत समुहाला गेल्या आर्थिक वर्षात 14 लाख रुपये इतका नफा झाला आहे.यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन महिला बचत समुह व दोन पुरुष बचत समूहाच्या पदाधिकारी यांचे सत्कार ज्येष्ठ साहित्यिक बा.ना. धांडोरे, ज्येष्ठ संचालक सर्वोत्तम रणशूर मामा यांच्या हस्ते सत्कार करण्यात.श्री बाबा बनसोडे सर यांनी सूत्र संचलन केले आणि आयु. जितेंद्र वाघमारे सर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या व बचत समुहाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दुसऱ्या सत्रात नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रदीपकुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. डॉ. अंगद मुके यांनी प्रास्ताविक केले.संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीपकुमार कांबळे यांनी 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षाचा अहवाल मांडला.त्याला सर्व सदस्यांनी मान्यता दिली. गेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेने अतिशय काटकसरीने कारभार करत 244000 इतका नफा कमावला असुन पहिल्याच वर्षी संस्थेला जिल्हा उपनिबंधक यांनी अ दर्जा दिला आहे.यासाठी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांचे फार मोलाचे योगदान लाभले आहे.
सभेच्या शेवटच्या सत्रात संस्थेचे सचिव डॉ.अरुणकुमार इंगळे यांनी भविष्यात संस्थेच्या वतीने सभासदांच्या हितासाठी
1. सभासद जीवन विमा योजना
2. सभासद पेन्शन योजना
3. सभासद आरोग्य विमा योजना
राबविण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या दिनांक 24 मार्च 2026 च्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले.
उक्त तिन्ही योजनांची माहिती व वैशिष्ट्ये डॉ. इंगळे यांनी सांगितली. या तीनही योजनांना भविष्यात राबविण्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी प्राप्त करण्यात आली. उपस्थित सर्व सन्माननीय सभासदांनी या तीनही योजनांना सहर्ष मंजुरी दिली.
तत्पूर्वी डॉ अरुणकुमार इंगळे यांनी राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेला बहीण भावंडभाव काय आहे, ते सांगून हा बंधुभाव विकसित करून आपण आपल्या सभासद बांधवांचे हित जोपासले पाहिजे असे आवर्जून सांगितले.
गेली सहा वर्षे विनामोबदला आणि पदरमोड करून जे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संस्था आपणास अर्थसहाय्य उपलब्ध करून देत आहेत, अशा समाजाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्थेशी जर का तुम्ही गद्दारी केली तर जगाच्या पाठीवर तुम्हास अन्य कुणीही मदतीचा हात देणार नाही, हे पक्के ध्यानात ठेवावे असा कठोर इशाराही त्यांनी दिला.
तसेच संस्थेचे कर्जदार यांनी कर्जाचे हप्ते नियमित भरुन पतसंस्थेला शाश्वत स्थान निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान माॉर्निंग ग्रुपच्या महिलांनी एक भीम गीत सादर केले.तसेच माता सावित्री -फातिमा महिला बचत समुहाच्या महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर एक ओवी गायली.जितेंद्र वाघमारे सर, डॉ .अंगद मुके, आबासाहेब साबळे यांनी ही आपली कला सादर केली.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली.या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व संचालक तसेच बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
यावेळी रमाई अकॅडमीचे विद्यार्थी जिलानी मत्तेखान यांचा रेल्वे मध्ये क्लास टू मध्ये निवड झाल्याबद्दल अध्यक्ष प्रदीपकुमार कांबळे, सचिव डॉ अरुणकुमार इंगळे आणि प्राचार्य आमसिद्ध सोनकांबळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तक्षशिला सामाजिक संस्थेचे वतीने सर्व संचालकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संचालिका आयु. अस्मिता माने यांनी सर्वांचे आभार मानले. सामुदायिक राष्ट्रगीत गाण्यात आले.चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.




