Uncategorized

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार अधिक गोड! सानुग्रह अनुदानात अडीचपट वाढ; आता मिळणार १२ हजार ५०० रुपये

नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांची कर्मचाऱ्यांना दिवाळीची खास भेट; ५ हजारांऐवजी १२ हजार पाचशे रुपये 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

पंढरपूर : वर्षभर शहराच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीही आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ५ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानात अडीचपट वाढ करून यंदा प्रत्येक कर्मचाऱ्याला १२ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या निर्णयामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.

पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिताताई भालके यांनी ही आनंदाची घोषणा केली. शहर स्वच्छ ठेवण्यापासून नागरिकांना विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत नगरपरिषदेचे कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कष्टाची, मेहनतीची आणि योगदानाची जाणीव ठेवून सणासुदीच्या काळात त्यांच्या आनंदात भर घालण्याचा संवेदनशील निर्णय नगराध्यक्षांनी घेतला.

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. हा आनंद केवळ काही घरांपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या घराघरांत पोहोचावा, हीच भूमिका डॉ. प्रणिताताई भालके यांनी आपल्या निर्णयातून अधोरेखित केली आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचाही दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने सानुग्रह अनुदानात केलेली ही भरीव वाढ निश्चितच कौतुकास्पद आहे.

सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि आपल्या निर्णयातून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे नेतृत्व असावे तर असे! पद केवळ जबाबदारी म्हणून न पाहता प्रत्येक घटकाच्या आनंदाचा विचार करणाऱ्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांनी या निर्णयातून संवेदनशील नेतृत्वाचा प्रत्यय दिला आहे. त्यांच्या या दिवाळी भेटीमुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close