मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे कर्मचारी व सरकारचा संघर्ष निश्चित
ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे सरचिटणीस मिश्रा यांचा इशारा


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर,दि.27- आज देशभरात रेल्वे विभागात अडीच लाख पदे रिक्त असून याची भरती करणे तसेच विविध प्रश्न केंद्र सरकारने सरळ मार्गाने मान्य केले नाहीत तर आम्हाला सरकार विरोधात मोठा संघर्ष निश्चित करावा लागेल असा इशारा ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस गोपाल मिश्रा यांनी पंढरपूर येथे दिला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या मध्य रेल्वे व कोकण रेल्वेचे 72 वे अधिवेशन पंढरपूर येथील रेल्वे स्थानकामध्ये आयोजित करण्यात आले आहे. दि.27 ते 29 ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या या अधिवेशनास जवळपास पाच हजार रेल्वे कर्मचारी उपस्थित आहेत. सदर अधिवेशनाचे उद्घाटन झाल्यानंतर गोपाल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मध्य व कोकण रेल्वे विभाग संघटनेचे सरचिटणीस वेणू पी.नायर, जी.आर.भोसले उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिश्रा यांनी, रेल्वेची सर्वात मोठी समस्या म्हणजे अडीच लाख कर्मचाऱ्यांची पद रिक्त आहेत. खुद्द रेल्वे मंत्र्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, परंतु त्या प्रमाणात नोकर भरती होत नाही. आज देशात, महाराष्ट्रात बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना देखील नोकरी भरती केली जात नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या बाबत आम्ही सरकारला वारंवार मागणी करत आहोत. यासह बाह्यस्त्रोतांकडून अर्थात आउटसोर्सिंग व्दारे कामगार भरती होत आहे. यास देखील आमचा कडाकडून विरोध आहे. नवीन भरती नाही तर दुसरीकडे निवृत्त झाल्यानंतर पुन्हा 60 व्या वर्षी कर्मचाऱ्यांना दोन वर्षासाठी कामावर घेण्यात येत आहे. यास देखील आमचा विरोध असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. यासह आठवा वेतन आयोग, कामाचे तास, जादा कामाचे वेतन न मिळणे आदी विविध प्रश्न असून यावर तीन दिवस मंथन होणार आहे. या नंतर डिसेंबर महिन्यात विजयवाडा येथे अधिवेशन होणार असून याव्दारे सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. सरकारने वेळेत मागण्या मान्य केल्यास आम्हास मोठा संघर्ष करावा लागेल हे निश्चित असा इशारा दिला.
1974 चा इतिहास विसरू नका
यावेळी बोलताना वेणू पी.नायर यांनी, पूर्वी 11 हजार रेल्वे होत्या आणि 15 लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. परंतु आता 13 लाखाहून अधिक रेल्वे दिवसभरात कोट्यवधी प्रवाश्यांची वाहतूक करतात. प्रवासी संख्या वाढली, काम वाढले मात्र कर्मचाऱ्यांची संख्या केवळ 12 लाखच आहे. याचा सरकारने विचार करणे गरजेचे आहे. मागण्यांसाठी रेल्वे बंद करण्यावर आमचा विश्वास नाही. संवाद साधण्यावर आम्ही भर देऊ परंतु सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर 1974 साली देशभरातील 17 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांनी 20 दिवस केलेल्या आंदोलनाचा इतिहास थोडा आठवून बघा असा इशारा दिला.




