लाल मातीतील कुस्तीला नवसंजीवनी देण्याचे कार्य डॉ.कराड यांनी केले: हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्घाटन


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर , दि. २३ जुलै:“ लाल मातीतील कुस्तीला नवसंजीवनी देण्याचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले आहे. त्यांनी शक्तिची पूजा केली आहे. येथे आलेल्या वारकरी पैलवानांमुळे या लाल मातीची शोभा वाढली आहे, त्यांच्यामुळे वाखरी फुलली आहे. ”असे विचार हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग यांनी व्यक्त केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-परिसर विकास समिती, पुणे यांच्यातर्फे वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या आशीर्वादाने व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, नजरुद्दीन नायकवडी आणि महाराष्ट्र केसरी पै. विष्णूतात्या जोशीलकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, ह भ प तुळशीराम दा कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड,डाॅ. हनुमंत तुळशीराम कराड, राष्ट्रीय कुस्तीगीर महेश वरूटे, सुरजीत सिंग, श्रीकांत देशमुख, सामाजिक कार्यकर्ता सालगुडे पाटील, कदम पाटील, सरकार निंबाळकर, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव, भीमराव आदलिंग, शिवाजीराव काळे, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा.विलास कथुरे उपस्थित होते.
हिंदकेसरी पै. दिनानाथ सिंग म्हणाले, “हा सोहळा मन आणि चित्त प्रसन्न करतो. त्यामुळे येथे येणार्या प्रत्येक भक्ताला तीर्थक्षेत्रात आल्याची अनुभूती मिळते. डॉ. कराड यांनी वैष्णवांच्या मेळाव्यात कुस्तीचा आखाडा भरविला आहे. येथे भक्ती आणि शक्तीचा आदर्श उभा राहिलेला दिसत आहे.”
डॉ. मंगेश कराड म्हणाले, वारकरी संप्रदाय परंपरा 750 वर्ष जुनी आहे. याच परंपरेचे पाईक विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांनी समाज घडविण्यासाठी विश्वशांती केंद्राची स्थापना केली. या माध्यमातून सर्व संतांची शिकवण पुढे चालू ठेवली आहे. यातून आत्मचिंतनाची दिशा दाखविली आहे. वारकरी संप्रदाय जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. आज येथे भक्ती आणि शक्तीचा संगम दिसून येत आहे. याच कार्याचा भाग म्हणजे ही कुस्ती स्पर्धा आहे.
श्रीकांत देशमुख म्हणाले, संस्कृती आणि परंपरा टिकवणारी ही प्रथा पुढे चालवत डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात कुस्तीचे आयोजन केले. वारकरी हा काटक आहे. डॉ. कराड यांच्या कार्यासमोर सर्व पुरस्कार नगण्य असून त्यांचे कार्य अतुलनीय आहे.
प्रा.विलास कथुरे यांनी प्रास्ताविक व कुस्ती स्पर्धाचे नियोजन केले.
बाबा निम्हण यांनी धावते समालोचन केले.
डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले.




