कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिवलचे आयोजन

उद्योजक शशिकांत करळे आपले विचार व्यक्त करताना
जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर: ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे ग्रामीण विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवण्याचे केंद्र बनले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे व्यवसायाभिमुख विद्यार्थी घडवण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. या उद्दिष्टांना प्रमाण मानून महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिवलचे केलेले आयोजन हे स्तुत्य पाऊल आहे.’ असे प्रतिपादन सुहासिनी दुग्धालय उद्योग समूहाचे संस्थापक व नवउद्योजक शशिकांत कराळे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टिवल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित उद्घाटनपर भाषणात शशिकांत कराळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी टी जाधव हे होते.
कराळे पुढे म्हणाले की, “या महाविद्यालयातून माझ्यासारख्या विद्यार्थ्यांवर संस्कार झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थी समाज जीवनात यशस्वीरित्या जगत आहेत. भावी काळात विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांवर अवलंबून न राहता लहान लहान कौशल्य आत्मसात करावीत. पालकांनी देखील पाल्याच्या केवळ गुणांच्या टक्केवारीकडे लक्ष न देता त्यांच्या व्यावहारीक, कौशल्यपूरक व व्यावसायिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी वाणिज्य शाखेकडे व्यावसायिक शिक्षण हे प्रासंगिक असून त्याचा लाभ या कॉमर्स फेस्टिवलच्या माध्यमातून होईल.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी टी जाधव म्हणाले की, “व्यक्तीमत्व विकास हा कोणत्याही व्यवसाय किंवा उद्योगाची पूर्वअट असते. या दृष्टिने कॉमर्स विभागात विविध क्लब तयार केलेले आहेत. त्या माध्यमातून के. एस. अय्यर, रतनजी टाटा आणि सी.के.प्रल्हाद अशा महान व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी हा उपक्रम राबवला आहे. त्यातून लोकांना रोजगार देणारे विद्यार्थी विकसित होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.“
या फेस्टिवल सप्ताहामध्ये भित्तीपत्रक, गटचर्चा, प्रश्नमंजुषा, जाहिरात निर्मिती स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून एक दिवसाचे ट्रेड फेअर देखील आयोजित केले आहे. सप्ताहाचा समारोप ग्राहक दिन साजरा करून तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरीत करून होईल.
या उद्घाटनपर कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. सुशील शिंदे, डॉ. अमर कांबळे, डॉ. रमेश शिंदे, डॉ. आनंद शिंदे, प्रा. सागर शिवशरण हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सविता उप्पल्ली यांनी केले. तर सूत्रसंचालन बी. कॉम. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. दाक्षायणी कोळी व कु. प्रगती लवटे तसेच प्रा. प्रगती पारेकर यांनी केले. शेवटी डॉ. सारिका केदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.



