Uncategorized

लक्ष्मीबाईंच्या अश्रूंमधून उभा राहिला रयतचा वटवृक्ष– प्रा. पोपट काटकर

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर : “स्त्रियांच्या अश्रूंमध्ये परिवर्तनाची प्रचंड ताकद असते; सीतेच्या अश्रूंनी रामायण आणि द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले, त्याचप्रमाणे लक्ष्मी वहिनींच्या अश्रूंमधून रयत शिक्षण संस्थेचा विशाल वटवृक्ष उभा राहिला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षणाची चळवळ उभारली; मात्र त्या चळवळीच्या पाठीशी लक्ष्मीबाईंचा निःस्वार्थ त्याग, माया आणि समर्पण यांची भक्कम साथ होती. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आईसारखे प्रेम देणे, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून स्वतःचे सुख त्यागणे, त्यांच्या जीवनात आत्मीयता निर्माण करणे ही कार्ये त्यांनी निष्ठेने पार पाडली.” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. पोपट काटकर यांनी केले.


येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती, सांस्कृतिक विभाग आणि ‘कमवा व शिका’ योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. टी. जाधव हे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पाहुणे व अध्यक्षांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला.

“रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील : जीवन व कार्य” या विषयावर प्रमुख वक्ते प्रा. पोपट काटकर यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय जीवनाचा सखोल ऊहापोह केला. ते पुढे म्हणाले की, “ लक्ष्मीबाई यांनी ८० तोळे सोन्याचा त्याग केला. हा त्याग केवळ आर्थिक नव्हता, तर तो सामाजिक बांधिलकीचा आणि मूल्यनिष्ठतेचा आदर्श होता. “स्वाध्याय, स्वावलंबन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य” या चतु:सूत्रीवर उभ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत लक्ष्मीबाईंच्या प्रेमळ त्यागाचे खत पडले असल्यामुळेच ही संस्था आज वटवृक्षासारखी फोफावली आहे”, असे त्यांनी नमूद केले. लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, प्रारंभीच्या सनातनी संस्कारांवर मात करून त्यांनी सर्व समाजघटकांना आपलेसे केले. त्यांच्या आयुष्यातील त्याग, संयम आणि मातृत्वभाव या गुणांमुळेच त्यांना “रयत माऊली” ही उपाधी प्राप्त झाली. “त्यांचे कार्य हिमालयापेक्षा उंच आणि महासागरापेक्षा अथांग आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी “रयत” आणि “ माउली” या संकल्पनांतील मूल्यांचा वेध घेत, लक्ष्मीबाईंच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा शाल, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुशील शिंदे, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. समाधान माने, पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बलवंत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य विठ्ठल काटकर, कार्यालयीन प्रमुख चौरंगनाथ वाघमारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले, तर समारोप प्रसंगी आभार समारंभ समितीचे चेअरमन डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. हरिभजन कांबळे, प्रा. बापूसाहेब घोडके, प्रा. अंकुश घुले, प्रा. मोहिनी सावंत,अभिजीत जाधव, अमोल माने, भीमराव मेटकरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close