स्वेरीतील एमएचटी- सीईटी क्रॅश कोर्स विद्यार्थ्यांच्या हिताचा -सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे
एमएचटी-सीईटी २०२३’ साठी स्वेरीत ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’चे उदघाटन, सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘इंजिनिअरिंग प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी शासनाची सीईटी परीक्षा देत असताना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात अचूक मार्गदर्शन व्हावे या हेतूने स्वेरीकडून दि, २० मार्च ते १० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’ आयोजित करण्यात आला आहे. या क्रॅश कोर्स मध्ये सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि चांगल्या करिअरबाबत प्रोत्साहन देण्यासाठी स्वेरीत सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून या ‘क्रॅश कोर्स’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामधून फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांची तयारी करून घेण्याचा हेतू असून यासाठी तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. या कोर्सचा विद्यार्थ्यांना शासनाच्या मुख्य सीईटी परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे स्वेरीतील एमएचटी- सीईटी क्रॅश कोर्स हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचा आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या ‘एमएचटी-सीईटी २०२३’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आज ऑनलाईन असलेल्या ‘क्रॅश कोर्स’चे उदघाटन करण्यात आले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात प्रा.यशपाल खेडकर म्हणाले की, ‘संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणात मिळवलेले यश अदभूत आहे. चालू शैक्षणिक वर्षात इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला व इतरही कोर्सेसला झालेले १०० टक्के प्रवेश, पदवीच्या सर्व पात्र अभ्यासक्रमांना असलेले एनबीएचे मानांकन तसेच ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ मानांकन असलेले सोलापूर विद्यापीठातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय, उच्च निकालाची परंपरा, प्लेसमेंटच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात मोठमोठ्या पॅकेजवर विद्यार्थ्यांची होणारी निवड, महाविद्यालयाला मिळालेली मानांकने, संशोधन आदी बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच पूरक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर स्वेरीकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढत आहे. एमएचटी- सीईटी परीक्षेबाबत सुयोग्य मार्गदर्शन करण्यासाठी या मोफत क्रॅश कोर्सची संकल्पना वस्तुस्थितीत आणली असून एप्रिल अथवा मे महिन्यात ‘स्वेरी’ मध्ये सीईटी ची ‘मॉक टेस्ट (सराव परीक्षा)’ देखील घेण्यात येणार आहे.’ असे सांगून या कोर्सबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. पुढे बोलताना स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की, ‘या एमएचटी- सीईटी क्रॅश कोर्ससाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक विद्यार्थी जॉईन झालेले दिसत आहेत. त्यांची तळमळ पाहता ‘मला बनायचंय’, ‘मला घडायचंय’ या उच्च विचाराने विद्यार्थी बारावी परीक्षेनंतर सुट्टी घेण्यापेक्षा हा कोर्स करून वेळ सत्कारणी लावत आहेत. ही बाब मोलाची असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ध्येय निश्चित ठेवून ते साध्य करण्यासाठी जे कार्य करावे लागते ते करण्यासाठी ज्यांची मानसिकता असते, तेच जीवनात यशस्वी होतात. यासाठी मनाची तयारी करावी लागते. जे ध्येय गाठण्याचे ठरवतात ते वेळ वाया घालवत नाहीत. विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स मोफत असून त्याचा फायदा करून घ्या. यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. ज्ञानाची गुंतवणूक झाली आहे. आपले करिअर घडवण्यासाठी हा एमएचटी- सीईटी क्रॅश कोर्स महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. या ज्ञानार्जन प्रक्रियेत स्वेरीच्या ज्ञानवंत व प्रज्ञावंत शिक्षकांचा वापर करून या मौल्यवान क्रॅश कोर्सचा फायदा करून घ्या.’ असे आवाहन केले. या क्रॅश कोर्स मधील फिजिक्सचा पहिला तास प्रा.सुनील गायकवाड यांनी घेतला. यामध्ये प्रा.गायकवाड यांनी सीईटीच्या परीक्षेचे स्वरूप, गुण, प्रश्नांचे स्वरूप, एकूण प्रश्न, मार्कांची विभागणी, परीक्षेच्या पेपरसाठी असणारा कालावधी आदीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये सुरू केलेल्या या क्रॅश कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी मोबा.नं.–८९२९१००६१३ व ९५९५९२११५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले आहे.
.