स्वेरी सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स व इनोव्हेटीव माईंड क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संकल्पना शिबिर संपन्न

छायाचित्र –स्वेरीमध्ये स्वेरी सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स व इनोव्हेटीव माईंड क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या दोन दिवसीय संकल्पना शिबिरात सहभागी विद्यार्थी, सोबस सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक डॉ. नितीन कुलकर्णी, सोबसचे अधिकारी वर्ग व स्वेरीचे प्राध्यापक वर्ग.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स व इनोव्हेटीव माईंड क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने परस्पर सहयोग, संवाद व मनोरंजनाच्या माध्यमातून दि. २५ व दि.२७ जून २०२२ रोजी दोन दिवसीय संकल्पना शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शाश्वत अन्न व कृषी, तंत्रज्ञान व अपारंपारिक ऊर्जा, आरोग्य व निरोगीपणा तसेच जल स्वच्छता यासारख्या आव्हानात्मक विषयांवर काम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या १७ गटांनी व स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी या संकल्पना शिबिरात सहभाग घेतला होता. या शिबिरातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत झाली.
सोबस सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक डॉ. नितीन कुलकर्णी हे या दोन दिवसीय कार्यशाळेचे मार्गदर्शक होते. डॉ.कुलकर्णी यांनी मुलांचा समूह करून त्यांना स्थानिक क्षेत्रासाठी नवीन संकल्पना व उपाय शोधण्यासाठी, विश्लेषण व विचारमंथन करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी यूएसए च्या सिलिकॉन व्हॅली मधील महिला उद्योजिका सई इंगळे यांनी परदेशी उद्योग क्षेत्रात महिलांना असणाऱ्या संधी व सेमी कंडक्टर इंडस्ट्री मधील वाढती आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन केले तसेच नवीन उद्योगनिर्मिती मध्ये महिलांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. ग्रीनटिंन सोल्युशन्सचे संस्थापक राज डुबल यांनी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या अशा १७ गटांनी मांडलेल्या विविध समस्यांच्या उपाय योजनांचे परीक्षण करून पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेतील विद्यार्थी शिवराज मगर म्हणाले की, ‘माझ्यासाठी हा शिकण्याचा अनुभव पूर्णपणे नवीन होता. या अप्रतिम कार्यशाळेने मला व्यावहारिक व व्यावसायिक जीवनाची जाणीव करून दिली. यातून अभ्यासू ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकाद्वारे मिळालेले ज्ञान अधिक उपयोगी ठरते हे समजले.’ सदर कार्यशाळेचे उदघाटन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते व सोबसचे संस्थापक दिग्विजय चौधरी, सोबसच्या संचालिका रेषा पटेल, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत झाले. उदघाटनपर भाषणात प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे आपली पावले वळवावीत व आपल्याबरोबर इतरांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.’ सदर संकल्पना शिबिरातून तीन उत्कृष्ट संकल्पनाची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक आयेशा तांबोळी व त्यांची टीम (रीड्युस कम्युनिटी वॉटर वेस्टेज), द्वितीय क्रमांक ऋतुजा सर्वगोड व त्यांची टीम (रीड्युस इलेक्ट्रिकल लॉस इन कमर्शियल एस्ट्याब्लीशमेंट) व तृतीय क्रमांक विभागून स्नेहल कोरे व त्यांची टीम (ई-लिटरसी अबाऊट हेल्थ केअर) आणि विजय ताकभाते व त्यांची टीम (सोलार ऑपरेटेड स्प्रे पंप) तसेच उत्तेजनार्थ पारितोषक एस.एस.पाटील यांना मिळाले. रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक अशा स्वरूपात इनोव्हेटीव माईंड क्लब (स्पाईस स्कीम, एआयसीटीई) यांच्या माध्यमातून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. संकल्पना शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा.अविनाश मोटे, डॉ.प्रवीण ढवळे, प्रा. कुलदिप पुकाळे, प्रा. उर्मिला गुळघाणे, सोबसचे इशांत पंत, गिरीश संपत व इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.



