Uncategorized

दर्जेदार शैक्षणिक उपक्रमांमुळे ‘स्वेरी’ची राज्यात विशेष ओळख –डॉ.रजनीश कामत

स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ थाटात संपन्न

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- ‘संशोधनातील प्रगतीमुळे सर्वात प्रथम माझ्या कानावर स्वेरीचे नाव आले. त्यावेळी स्वेरीमध्ये संशोधन क्षेत्रात ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’ चे मोठे प्रोजेक्ट यशस्वी झाले होते. स्वेरी हे महत्त्वाच्या संशोधनाच्या संबंधी प्रबंध व प्रोजेक्ट सादर करणारे सोलापूर विद्यापीठामधील आदर्श महाविद्यालय असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव न राहता स्वेरीने तंत्रशिक्षणाचा विकास आणि त्याचा दर्जा सिद्ध केलेला आहे. गेल्या पंचेवीस वर्षाचा इतिहास उलगडताना स्वेरी सातत्याने करत असलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले आहे. सर्वांचा विकास करत असताना ‘व्हॅल्यू एज्युकेशन’ हे देखील महत्त्वाचे आहे हा संदेश स्वेरीने दिला आहे. स्वेरी मधील सर्व उपक्रम विद्यार्थी केंद्रित असतात म्हणून स्वेरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. स्वेरीकडून प्लेसमेंटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याचे कार्य केले जाते. हे अवघड असणारे कार्य स्वेरीने ग्रामीण भागात यशस्वीपणे करून दाखवले याचाही मला सार्थ अभिमान वाटतो. एकंदरीतच दर्जेदार शैक्षणिक उपक्रमांमुळे स्वेरीची राज्यात विशेष ओळख निर्माण झाली आहे.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी केले.

स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत हे मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते हे लाभले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करून स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीवर प्रकाश टाकला तसेच स्वेरीच्या स्थापनेपासून ज्या ज्ञात- अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी विद्यार्थी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात डॉ.रजनीश कामत यांनी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुरूप अभ्यासक्रम लागू करण्याबाबत पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आग्रही असल्याचे सांगीतले तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची रचना आणि अभ्यासक्रम विक्रमी वेळेत एनईपी-२०२० अनुरूप करण्याच्या सोलापूर विद्यापीठाच्या तत्परतेचेही त्यांनी कौतुक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी स्वेरी कडून केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. एनईपी- २०२० च्या जलद अंमलबजावणीसाठी केलेल्या कार्याचा फायदा केवळ विद्यापीठालाच होत नाही तर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांना होतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. पुढे डॉ.कामत यांनी तंत्रशिक्षण, संशोधन आदी बाबतीत स्वेरीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे आणि डॉ.बी. पी. रोंगे आणि स्वेरी मधील त्यांच्या समर्पित टीमच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले तसेच येत्या काळात शैक्षणिक क्षेत्रातील आपले स्थान स्वेरी अधिक उंचावेल असा आशावादही व्यक्त केला. माळशिरसचे आमदार आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम सातपुते यांनीही स्वेरीच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या उदात्त हेतूने अत्यंत बिकट हालअपेष्टा सहन करत आणि स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवून अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. बी.पी. रोंगे सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाचे द्वार खुले केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वोत्तम पद्धतीने तंत्रशिक्षणाचा प्रसार करत असलेले स्वेरी हे बहुधा एकमेव शिक्षणसंकुल असावे.’ असे त्यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी स्वेरीचे उपाध्यक्ष हनिफ शेख, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेवराव कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त अशोक भोसले, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त एस.टी. राऊत, युवा विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे, डॉ.श्रीदेवी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे, प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, स्ट्रक्चरलचे प्रमोद जोशी, बाटुचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ, स्वेरीच्या गव्हर्निंग बॉडीचे डॉ.विजय कुलकर्णी, शास्त्रज्ञ व्ही. के. सूरी, वालचंद सांगलीच्या प्लेसमेंट विभागाचे संजय धायगुडे, माजी विद्यार्थी संघटनेचे दत्ता घोडके, डॉ.विश्वासराव मोरे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी परिवारातील सदस्य, विद्यार्थी, पालक, पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिक, पत्रकार, वकील मित्र, हितचिंतक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग व संवाद प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. एकंदरीतच स्वेरीचा हा रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close