Uncategorized

नवीन शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषांना प्राधान्य’ – डॉ. सुनील देवधर

ज्येष्ठ समीक्षक व अनुवादक डॉ. सुनील देवधर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर – “नवीन शैक्षणीक धोरण हे विद्यार्थी केंद्रित असून
महाविद्यालयीन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा ज्ञान, कला, कौशल्य आणि रोजगार या गोष्टी मिळण्या विषयी धोरण आखले आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत भाषेचा अडसर न ठरता स्थानिक भाषांचा वापर उच्च शिक्षणात झाला पाहिजे. शिक्षणातून संस्कार आणि संस्कृती जतन झाली पाहिजे. त्यासाठी नैतिक मूल्यांचा विकास
व्हावा. यासाठीची तरतूद या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. स्थानिक भाषेतील ज्ञान, माहिती आणि संस्कृती यांच्या संवर्धनातून राष्ट्रीय एकात्मता प्रबळ होईल ” असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अनुवादक डॉ. सुनील देवधर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात रुसा कॉम्पोनंट आठ अंतर्गत हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. यावेळी मंचावर बीजभाषक डॉ. सदानंद भोसले, डॉ. प्रकाश कोपर्डे, प्रोफेसर भीमसिंग, डॉ. गिरीश पवार, डॉ. टिकम शेखावत, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे व
उपप्राचार्य प्रा. अप्पासाहेब पाटील, डॉ. समाधान माने आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुनील देवधर पुढे म्हणाले की, “भाषा ही संवादासाठी
असते ती वादासाठी नसते. जो व्यक्ती अधिक भाषा जाणतो तेवढा तो ज्ञानी आणि प्रगल्भ असतो. भाषेच्या माध्यमातून दोन व्यक्ती, दोन समाज आणि दोन देश जोडले जातात. दोन भाषांमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. भाषेच्या माध्यमातून राजकारण करता येते पण भाषेचे राजकारण केले जावू नये. विद्यार्थ्यांनी अनेक भाषा अवगत केल्या पाहिजेत. नवनवीन भाषेमुळे साहित्य आणि संस्कृतीची ओळख होते.”

या राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. सदानंद भोसले

या राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. सदानंद भोसले यांनी केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, “भारतीय भाषा या नवीन शैक्षणिक धोरणाच्या केंद्रस्थानी आहेत. प्रत्येक देशाचा विकास हा त्या देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. देशाचा आदर्श नागरिक घडविणे. त्याच्यात मानवी मूल्यांची निर्मिती करणे. चांगला माणूस घडविणे. या बाबीची अपेक्षा केली आहे. भारतीय संस्कृतीने वैश्विक शिक्षण धोरणास कधीही विरोध केला नाही. भारताने ठरविलेल्या पहिल्या शिक्षण नीतीवर युरोपीय शिक्षणाचा प्रभाव होता. दुसऱ्या शिक्षण नीतीवर अमेरिकन शिक्षण पद्धतीचा प्रभाव होता. ही बाब लक्षात घेवून केंद्र सरकारने आताच्या शैक्षणिक नीतीवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव नियोजित केला आहे.”

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.
चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “जागतिकीकरणातील बदल आणि गरजा लक्षात घेवून नवीन शैक्षणिक धोरणात भाषा आणि रोजगार यांचा विचार केला आहे. शिक्षणातील गळतीचे प्रमाण लक्षात घेवून अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा लाभ व्हावा ही भूमिका नव्या शैक्षणिक धोरणात प्राधान्याने मांडलेली दिसते.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय हिंदी विभाग प्रमुख डॉ. फैमिदा बिजापुरे यांनी करून दिला. या कार्यक्रमास देशातील विविध राज्यातून अनेक प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. हा
कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये प्रा. डॉ. धनंजय साठे, प्रा. डॉ. धनंजय वाघदरे, प्रा. कुबेर गायकवाड, प्रा. परमेश्वर दुधाळ, प्रा. सोमनाथ
व्यवहारे, प्रा. नानासाहेब कदम, प्रा. रावसाहेब मोरे, प्रा. सुहास शिंदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिता मगर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. प्रशांत नलवडे यांनी मानले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close