Uncategorized

गुरुजनांचा आदर ठेवून वाटचाल करावी -सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे

लोकमान्य हायस्कूलचा सन १९७२-७३ बॅचचा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ स्वेरीमध्ये साजरा

छायाचित्र- स्वेरीमध्ये लोकमान्य विद्यालय पंढरपूरच्या सुवर्ण महोत्सवी, आनंदी यात्रेचे उदघाटन करताना स्वेरीचे डॉ.बी.पी. रोंगे, सोबत लोकमान्य हायस्कूलचे मुख्याध्यापक अभय आराध्ये, धारूरकर सर, निकते सर, जहागीरदार सर, हेंद्रे कटेकर, संयोजक डॉ. विश्वासराव मोरे, संभाजी आसबे, माधुरी गाताडे, दीपक संकेश्वर व माजी विद्यार्थी इतर मान्यवर.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (संतोष हलकुडे) – ‘आपण आयुष्यात ज्या पद्धतीने घडतो त्याचे संपूर्ण श्रेय गुरुजन वर्गाला जाते. आयुष्याचा प्रवास करत असताना माणूस म्हणून जे काही करतो ते गुरुंमुळे शक्य होते. लोकमान्य शाळेचे ‘माजी विद्यार्थी’ म्हणून आपण पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत,त्याबद्दल मन:पूर्वक शुभेच्छा. तसेच जहागीरदार सर, केसकर सर, धारूरकर सर यांच्या आठवणीने हा सोहळा खर्‍या अर्थाने कृतार्थ झाला. व्हिक्टोरिया ज्युबिली नावाने सुरू झालेली ही शाळा पुढे ‘लोकमान्य हायस्कूल’ म्हणून नावारूपाला आली. त्याचप्रमाणे माझेही शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयाशी साधर्म्य असल्यामुळे त्याची ही आठवण आज ताजी झाली. जसे गुरुवर्य घडवतात तसेच माझे गुरुवर्य आप्पा कुलकर्णी सरांनी देखील मला घडविले. आप्पा कुलकर्णी सरांचा मी खोडकर विद्यार्थी होतो. पुढे त्यांनी योग्य पद्धतीने घडविल्यामुळेच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि मी आज जो काही आहे तो त्यांच्या शिक्षणामुळेच, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच. सर्वांनी गुरुजनांचा आदर ठेवून पुढील वाटचाल करावी कारण गुरूंच्या योग्य मार्गदर्शनामुळेच आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.

‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा…’ या पहिल्याच गीताने कार्यक्रमाला रंगत येऊ लागली. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये पंढरपूर शहरातील लोकमान्य हायस्कूलच्या सन १९७२-७३ च्या जुन्या अकरावीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांच्या ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन ५० वर्षानंतर केले होते त्याच्या उदघाटनप्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलनानंतर माधुरी गाताडे यांनी सर्वांचे स्वागत करून डॉ. विश्वासराव मोरे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याचे सांगून यामुळे सर्वांच्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर उत्साह व आनंद वाहत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात संयोजक डॉ. मोरे यांनी या मेळाव्याच्या नियोजनापासून केलेल्या बैठका, जमवाजमव करताना आलेला अनुभव, गुरुजन वर्ग यांच्याशी संपर्क व आमंत्रण आदी बाबी करताना सर्वांचे सहकार्य झाले. त्यामुळे हा मेळावा यशस्वी होत असल्याचे सांगितले. यावेळी देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद मेजर कुणाल गोसावी व निधन झालेल्या लोकमान्य शाळेतील सहकारी, गुरूजन वर्ग व विद्यार्थी मित्रांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. मोरे पुढे म्हणाले कि, ‘ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या लोकमान्यच्या अकराव्या बॅच मध्ये १९७२-७३ साली आम्ही शिक्षण घेतले आहे. अशा शिक्षणात बालपणी सोबत असणारे मित्र आता नातू, पणतू सोबत घेवून आले आहेत. याचा सर्वस्वी आनंद होत आहे.’ असे सांगून स्वेरीचा संपूर्ण इतिहास सांगत असताना ‘इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या कर्तुत्वामुळे राज्यात अव्वल दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये स्वेरीची ही महाविद्यालये आहेत.’ असे आवर्जून सांगितले. लोकमान्यचे माजी मुख्याध्यापक प्र.द.निकते सर म्हणाले की, ‘हा कार्यक्रम अत्यंत नेटकेपणाने केला असून पशुवैद्यकीय अधिकारी आणि साहित्य यांचा अत्यंत जवळचा ऋणानुबंध आहे, हेही आज समजले. ‘माणूस स्वतःसाठी जगला तर मेला आणि दुसऱ्यासाठी मेला तर जगासाठी जगला’ हे ब्रीदवाक्य सर्वश्रुत आहे. आज जिकडे तिकडे माणसं आहेत, खूप माणसे आहेत परंतु माणसातील माणुसकी कमी होत आहे, याची खंत वाटते. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी माणुसकी जपण्याची खरी गरज आहे. आज आपल्या सहवासात जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. आपण सर्वजण सुसंस्कारित झालात हेच शाळेचे यश आहे. अखंड ज्ञानदीप लावण्याचे कार्य लोकमान्य शाळेने केले आहे. त्यावेळी सबनीस सरांकडे धीरोदत्तपणा, आनंददायीपणा, वक्तशीरपणा होता त्यामुळे कुठेही आणखी जास्त शिक्षण घेण्याची गरज वाटत नव्हती. याच आनंद यात्रेचे आपण वाटेकरी झाले पाहिजे. तुमच्या कार्याचा सुगंध दरवळत राहिला पाहिजे. एकुणच गुरुचा वाटा समर्थपणे पुढे नेण्याचे कार्य केले पाहिजे.’ असे सांगून शाळेतील कामांचा अनुभव सादर केला. यावेळी दुसऱ्या सत्रात आपली ओळख, गाणी, विनोद सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये कोणी, प्रशासकीय अधिकारी तर कोणी डॉक्टर, कोणी कलावंत, पोलीस अधिकारी, साहित्यिक, शिक्षक, व्यापारी, राजकीय, सामाजिक कार्यात योगदान दिलेले सर्व मित्र कुटुंबासह सहभागी झाले होते. त्यामुळे हा मेळावा विशेष लक्षवेधी झाला. योगिनी ताठे, दीपक इरकल, डॉ.विश्वासराव मोरे यांनी किशोरकुमार, महमंद रफी व लता मंगेशकर यांची गाणी गायली. सर्व सहकाऱ्यांनी ‘सुवर्ण महोत्सव, आनंद यात्रा व लोकमान्य विद्यालय’ असे सुंदर शब्द लिहिलेल्या गांधी टोप्या, श्री.विठ्ठलाच्या चरणीचे उपरणे तसेच चंदन उटी यांच्या सुगंधामुळे वातावरण अध्यात्मिक झाले होते. रंजना गांधी, दत्तात्रय साळुंखे, बाळकृष्ण पावनगडकर, महामुनी यांच्या जुन्या आठवणी व मनोगतांमुळे सभागृह भावपूर्ण झाले होते. निरोप घेताना अश्रू नयनाने पुन्हा भेटण्याचे संकल्प करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. सुवर्ण महोत्सवी आनंदयात्रेचे संयोजन नेटके व स्वेरीच्या नयनरम्य परिसरात आनंदाच्या वातावरणात पार पडले. कोल्हापूर, पुणे, सोलापूर येथील सत्तरच्या आसपास सहकाऱ्यांनी भाग घेऊन हा मेळावा यशस्वी केला. यावेळी वीर पिता मुन्नागीर गोसावी व वीरमाता सौ. वृन्दादेवी गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. लोकमान्य हायस्कूलचे मुख्याध्यापक अभय आराध्ये, भैय्या जहागीरदार, श्री व सौ कटेकर, हेंद्रे मॅडम, बी.डी. धारूरकर आदी गुरुजन वर्ग, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी. बी. नाडगौडा, चंदू देशपांडे, सुभाष खटावकर, पद्मजा भिंगारे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली बोराटे, संभाजी आसबे, सी.एन. देशपांडे, ज्ञानेश्वर बोराटे, दीपक संकेश्वर, सुभाष खटावकर, मुन्ना गोसावी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक इरकल यांनी केले तर निवृत्त कृषी आयुक्त पांडुरंग लोंढे-वाठारकर यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close