धनगर जमातीच्या लोकांनी आरक्षणाचा भंडारा उधळण्यासाठी सज्ज व्हावे – प्रा. डॉ. दत्ताजीराव डांगे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाबाबत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेली याचिका ही अंतिम सुनावणीसाठी आलेली असून येत्या एक दोन महिन्यात सदर केसचा निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये आपण शंभर टक्के जिंकणार आहोत. असा विश्वास ऑनलाईन स्वरुपात झालेल्या मंचच्या बैठकीत मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रा. डॉ. दत्ताजीराव डांगे यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना प्रा. डॉ. दत्ताजीराव डांगे म्हणाले की, “आदिवासी जमातीच्या संघटनांचा महाराष्ट्र सरकारवर दबाव असल्याने विविध कारणे पुढे करून ही याचिका अंतिम सुनावणी पासून रोखण्याचे षड्यंत्र वारंवार केले जात आहे. ह्या याचिकेची सलग सुनावणी घेण्यात यावी. अशी विनंतीही यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.”
मंचचे प्रदेश अध्यक्ष सेवानिवृत्त आय.पी.एस. अधिकारी मधू शिंदे यांनी या याचिकेचा आजवरचा प्रवास उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितला तो असा की, ‘आजवर धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्यासाठी जमातीमधील अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि राजकीय पुढारी यांनी प्रयत्न केलेले आहेत. या प्रयत्नाबरोबरच ‘महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच’ या संघटनेने धनगर आरक्षणाच्या प्रश्नाचा मुलभूत अभ्यास करून जवळपास दोन हजारहून अधिक पृष्ठांची याचिका तयार करून घेतली. या याचिकेला शासकीय पातळीवरील ११३ सक्षम पुरावे जोडले असून यातील अनेक पुरावे लंडन येथील ग्रंथालयातून गोळा करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित असलेल्या ‘धनगड’ या अस्तित्वहीन जमाती संबंधी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘धनगड’ ही जमात महाराष्ट्रासह देशात कुठेही अस्तित्वात नाही. या सूचीमध्ये आदिम संस्कृती आणि जीवन पद्धती असणाऱ्या धनगर जमातीची नोंद राष्ट्रपती महोदयांना अपेक्षित होती. मात्र धनगर ऐवजी धनगड अशी नोंद झाल्याने धनगर जमात अनुसूचित जमाती आरक्षणापासून वंचित होते. म्हणून उच्च न्यायालयातील अनेक ज्येष्ठ विधी तज्ज्ञांकडून ही याचिका तयार करून घेवून ती मुंबई उच्च न्यायालयात नोव्हेबर २०१७ मध्ये दाखल केली आहे. आजवर या केसच्या ४२ सुनावण्या झाल्या असून अनेक प्रकारच्या अडचणी पार करून ही सुनावणी अंतिम निकालासाठी आलेली आहे. या बैठकीचे प्रास्ताविक खजीनदार पांडुरंग धायगुडे सर यांनी केले. यावेळी डॉ. जे. पी. बघेल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. एड. मोरारजी पाचपोळ, तुळशीराम आचणे, साईनाथ बुचे, शंकर कोळेकर, पुरुषोत्तम डाखोळे, ईश्वर ठोंबरे, रामभैय्या गावडे, प्रा. सोमनाथ लांडगे, अशोक शेळके, सुधाकर शेळके, प्रा. डॉ. विजय शिरसाठ, प्रा. डॉ. ज्ञानेदव काळे, डॉ. सुरेश येवले सह महाराष्ट्रातील विविध भागातून तीनशेहून अधिक कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीचे तांत्रिक नियोजन आयटी प्रमुख बिरू कोळेकर यांनी केले. या याचिकेसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मंचाचे पदाधिकारी चंद्रशेखर सोनवणे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. दत्ता सर्जे यांनी मानले.