Uncategorized

मौजे सिद्धेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर – “आजचा काळ बदलत चालला आहे. आजच्या काळात सर्व गोष्टी पैशात मोजल्या जातात. आई-वडिलांचे नाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्थिक संघर्षातून माणूस घडत असतो. प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे जाता येते. प्रतिकूल परिस्थितीचे कारण न सांगत आपण जिद्दीने त्याच्यावर मात केली पाहिजे. सामाजिक मूल्ये आणि नैतिक मुल्ये ही माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची असतात. ती जपल्यास आपले जीवन सुकर होते”. असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ. जे. जी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंतनाना देशमुख पुढे म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला मोठा इतिहास आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्वच स्वयंसेवकांनी आपल्या गावाचे सर्वेक्षण करून त्याचा अभ्यास केला पाहिजे. सिद्धेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीबाबतचा केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. शहरातील जीवनापेक्षा ग्रामीण भागातील जीवन चांगले असते. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. खेड्यामध्ये सुध्दा चांगले जीवन जगता येते. आधुनिक पद्धतीने शेती केली तर पुढील काळ चांगला असेल.”
डॉ. जे. जी जाधव म्हणाले की, “काम करण्याची इच्छाशक्ती मनामध्ये असायला हवी. त्यासोबत आपल्या कामाबाबत आपण प्रामाणिक असायला पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर श्रमाला पर्याय नाही. राष्ट्रीय सेवा योजनेतील सेवकांना या सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरातून नवीन अनुभव नवीन विचार आत्मसात करण्यास संधी मिळेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार होत असतात. कर्मवीर अण्णांनी विद्यार्थ्यांना श्रमाचे संस्कार दिले. श्रमाने मन आणि मेंदू उत्साहीत होत असतो. श्रमामुळे राष्ट्राची उभारणी होत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमातून राष्ट्राची उभारणी करावी.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “गावातून जाताना श्रमसंस्काराचे विचार घेऊन जावा. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास देशाला आपण समृद्ध करू शकतो. गावपातळीवर देखील काही प्रकल्प राबवली पाहिजे. प्रत्येकाने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. आपले आचरण चांगले पाहिजे. आपण आपल्या विचाराची प्रगल्भता वाढवली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचे भाग्य आहे की त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाची सेवा करण्याची संधी मिळते. सामाजिक जबाबदारीचे भान असणे आवश्यक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराची आज गरज असल्याचे दिसून येते. सिद्धेवाडी ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य कधी विसरता येणार नाही.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाधिकारी प्रा. सुमन केंद्रे, डॉ. बालाजी लोंढे, प्रा. सागर शिवशरण, प्रा. धनंजय कदम, डॉ. सचिन थिटे, डॉ संजय चव्हाण यांनी दैनंदिन उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या निरोप समारंभासाठी महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. आर. जे. कवडे, सिद्धेवाडीचे सरपंच सौ. रोहिणी सारंग जाधव उपस्थित होत्या. यावेळी सिद्धेवाडीचे ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. सुमन केंद्रे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close