शास्त्रज्ञ सोमनाथ माळी यांचे यश कौतुकास्पद -स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे
’ इस्त्रो 'मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या सोमनाथ माळी यांचा स्वेरीत सत्कार

छायाचित्र- ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सोमनाथ माळी यांची निवड झाल्यामुळे स्वेरी परिवाराच्या वतीने सत्कार करताना संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सोबत पालक संघाचे आबासाहेब दैठणकर, सचिन माळी, गोपाळ माळी स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे व इतर.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – ‘रस्ते खडतर असताना देखील परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता जे यश प्राप्त होते त्याची चर्चा दीर्घकाळ चालत असते. असेच यश सोमनाथ माळी यांनी मिळविले आहे. अशक्य वाटणारे यश हे वैचारिक बैठकीच्या पाठबळावर सहज साध्य होऊ शकते. त्याचेच उदाहरण म्हणजे इस्त्रोचे नूतन शास्त्रज्ञ सोमनाथ माळी हे होय. छोट्या वयातच त्यांनी यशाचे शिखर गाठले आणि स्वप्नवत वाटणाऱ्या ध्येयाला गवसणी घातली. हे खरोखरच कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
भारतातून दहा जणांची व महाराष्ट्रामधून एकमेव निवड झालेल्या तसेच आई वडील मोलमजुरी करत असलेल्या सरकोली (ता. पंढरपूर) येथील सोमनाथ माळी यांची तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून नुकतीच निवड झाली आहे. यामुळे शास्त्रज्ञ सोमनाथ माळी यांचा स्वेरी परिवाराच्या वतीने संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोमनाथ माळी यांनी परिश्रम पूर्वक मिळविलेल्या अभूतपूर्व यशाचे महत्व सांगत होते. पुढे बोलताना सचिव डॉ. रोंगे म्हणाले की, ‘अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही केवळ वैचारिक बैठक नसल्यामुळे यश येत नाही. यासाठी शिक्षणाबरोबरच वैचारिक बैठक हवी. कष्टाचे महत्त्व ओळखून अभ्यासाचे धडे गिरवावे लागतात. यात पालकांची जबाबदारी देखील महत्त्वाची आहे. भोवतालचे वातावरण आणि आणि परिस्थिती यांची स्पष्ट जाणीव करिअर करताना असली पाहिजे. याचबरोबर विचारांचे उत्तमपणे सादरीकरण करता आले पाहिजे. यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हेच सिद्ध होते. सोमनाथ माळी यांनी मिळविलेले यश हे आकाशाला गवसणी घालणारे आहे.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी शास्त्रज्ञ सोमनाथ माळी यांची पाठ थोपटली. सत्काराला उत्तर देताना इस्त्रोचे नूतन शास्त्रज्ञ सोमनाथ माळी म्हणाले की, ‘मी शिक्षणाच्या बाबतीत स्वेरीचे नाव खूप ठिकाणी ऐकत आहे. स्वेरीतील माझे विद्यार्थी मित्र देखील स्वेरीतील गुणवत्तेबाबत सतत चर्चा करत असतात. स्वेरीतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सोयी-सुविधा, शिस्त, अभ्यासासाठी असणारा पाठपुरावा, संवाद, यामुळे स्वेरीत प्रवेश घेणारे विद्यार्थी खरोखरच करिअरच्या दृष्टीने उत्तम आणि योग्य वाटचाल करत आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी यश मिळवताना परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षण आणि अफाट कष्ट करण्याची तयारी ठेवावी. त्याला योग्य दिशेची जोड दिल्यास निश्चित यश मिळते. अशावेळी अडचणीतून यश मिळविलेल्या अनेक यशस्वी लोकांच्या कार्याचे अनुकरण करणे योग्य ठरते. अंगी संयम बाळगल्यास आपल्याला इच्छित ध्येय गाठता येते. या दृष्टीने आपण तयारी करणे गरजेचे आहे. तसेच ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ हा देखील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण भागात असल्याचा व इंग्रजी येत नसल्याचा विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. यासाठी आयुष्यात आत्मविश्वासाने जेव्हा कष्ट करतो तेव्हा यश हमखास मिळत असते. त्यामुळे कितीही अपयश आले तरी खचून जाऊ नये. संयम ठेऊन आपले कार्य करत राहावे. यश आपोआप मिळेल. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत शास्त्रज्ञ डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे माझे आदर्श असून त्यांचे ‘अग्निपंख’ आणि ‘ट्रांन्सफार्मर ड्रीम्स इन टू एक्सलन्स’ ही दोन पुस्तके खूप भावली. या पुस्तकांमुळेच आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली.’ यावेळी महाराष्ट्र शिक्षक-पालक संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब दैठणकर, सचिन माळी, गोपाळ माळी यांच्यासह त्यांचे मित्र, स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे , स्वेरी अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, इतर अधिष्ठाता, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी आभार मानले.