Uncategorized

पर्यावरणाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वतःपासून प्रयत्न करणे गरजेचे :डॉ. बि.पी रोंंगे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वेरीत वृक्षारोपण संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर: ‘आज आपण जगभर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम पाहत आहोत. कोरोना महामारीच्या कालावधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता आज वृक्षांचे महत्व समजले आहे. वृक्ष लागवड करणे, त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. झाडांच्या अभावाने हवा, पाणी, माती प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, दुष्काळ असे अनेक प्रश्न मानवासमोर आ वासून उभे राहिले आहेत.आज प्रत्येकाने किमान एका तरी वृक्षाचे रोपण करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण समस्या माणसाला भेडसावत असताना सगळेजण या समस्यांबाबत केवळ तक्रार करत आहेत. परंतु या सर्व समस्या दूर करण्यासाठी माणसाला स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्यावरण ऱ्हासाला प्रत्येक मानव जबाबदार आहे. त्यामुळे आजच वृक्षाचे महत्त्व जोपासून प्रत्येकांनी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन श्री. विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी केले.
‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून व महाराष्ट्र शासनाच्या वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत सर्वत्र वृक्षारोपण केले जात असून स्वेरी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये डॉ. रोंगे यांच्या हस्ते चिंचेचे झाड लावण्यात आले तसेच स्टाफकडून देखील वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. रोंगे वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगत होते. प्रास्ताविकात विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त सविस्तर माहिती दिली. यावेळी सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी वाढती वृक्षतोड पाहता भविष्यात उद्भवणारे नुकसान आणि वृक्षारोपण, पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी आता सार्वजनिक सभा-संमेलने, चर्चासत्राचे आयोजन करणे गरजेचे झाले आहे. असेही आवर्जून सांगितले. स्वेरीमध्ये शैक्षणिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या हस्ते स्वेरी परिसरात वृक्षारोपण केले जाते. त्यामुळे गोपाळपुरच्या माळरानावर स्वेरी कॅम्पसमध्ये सर्वत्र हिरवळ पसरल्याचे दिसून येत आहे. स्वेरीच्या ग्रीन टीमचे प्रा. कुलदीप पुकाळे वृक्षारोपण आणि वृक्षलागवड संबंधित माहिती देताना म्हणाले की, ‘प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण करतो. आजपर्यंत स्वेरी परिसरात, चिंच, आंबा, पिंपळ, लिंब अशा विविध प्रकारची झाडे लावली असून फार्मसी विभागाकडे या झाडांसह औषधी वनस्पती देखील लावल्या आहेत.अशा प्रकारे स्वेरी कॅम्पस मध्ये जवळपास पाच हजार झाडे लावली असून त्यांची देखभाल आणि जोपासना उत्तमरित्या केली जात आहे.’ असे सांगितले. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. नितीन मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डी. फार्मसी प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, प्रवेश प्रक्रिया आधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी,रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विठाई नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील आदी उपस्थिती होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close