राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या धाडशी निर्णय घेत होत्या : डॉ. बी.पी. रोंगे
स्वेरीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यात अनेक महान गुण होते. होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोचविण्यात अहिल्यादेवी होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्या योग्य न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. अहिल्यादेवींनी भारतात अनेक मंदिरे व नदीघाट बांधले, जीर्णोद्धार देखील केला. माहेश्वर व इंदूर या गावांना अत्यंत सुंदर बनवले. अनेक देवळांच्या त्या आश्रयदात्या देखील होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. पतीच्या निधनानंतर त्यांच्या मिळकतीवर पहिला हक्क पत्नीचा असेल असे जाहीर करुन हा निर्णय प्रांतात अंमलात आणणाऱ्या, विधवेला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या, मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात करणाऱ्या, हुंडा बंदी, विनाकारण वृक्षतोड करण्याला, जंगलतोडीला बंदी घालणाऱ्या असे मोठ मोठे निर्णय घेत आणि अंमलात आणणाऱ्या अशा प्रकारे अनेक शौर्याची कार्ये आहिल्यादेवी होळकर यांनी केली म्हणूनच ‘पुण्यश्लोक’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.’ असे प्रतिपादन गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.
स्वेरीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. रोंगे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी राजमाता होळकर यांच्या संपूर्ण जीवन कार्याची ओळख करून देताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मापासून विवाह, कार्य, कामगिरी आणि संघर्ष यातून आलेले यश याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. सचिन गवळी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे,यांच्यासह इतर प्राध्यापक, बालाजी सुरवसे, अमोल चंदनशिवे, इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.