कासेगाव एमआयडीसीच्या कामाला गती द्या: आमदार समाधान आवताडें
भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर / पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या कामाला गती मिळावी, यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी मुंबई मंत्रालयातील कार्यालयात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेतली. यावेळी प्रस्तावित एमआयडीसीसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कासेगाव एमआयडीसीचा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेतील सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी तसेच त्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील कार्यवाहीची माहिती आमदार आवताडे यांनी घेतली. प्रकल्पाच्या कामात कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.कासेगाव येथे एमआयडीसी साकारल्यास पंढरपूर तालुक्यात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नवीन उद्योग, लघु व मध्यम उद्योग तसेच स्थानिक उद्योजकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पंढरपूरच्या भविष्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.पंढरपूर तालुक्यात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कासेगाव एमआयडीसीचा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्याने पाठपुरावा केला जात असून, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून एमआयडीसीचे काम मार्गी लागेपर्यंत आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.




