संशोधनासाठी स्वेरीच्या ‘क्षितीज’ सारख्या व्यासपीठाची गरज – डॉ.तपस देबनाथ
स्वेरीमध्ये ‘क्षितीज २ के २१’ हा ऑनलाइन उपक्रम संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘क्षितीज’ सारख्या स्पर्धात्मक तंत्र व्यासपीठामुळे संशोधन क्षेत्रात प्रगती होण्यास चालना मिळते आणि विद्यार्थ्यांना तांत्रिक कलागुण आणि त्यातील बारीक सारीक संशोधने करण्यासाठी आपोआप विशेष गोडी लागते. अशा ‘क्षितीज २ के २१’ इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे विद्यार्थी संशोधनात आपला अधिक वेळ घालवून नवनवीन प्रकारची साहित्य, साधने यांची निर्मिती करण्यास सक्षम होतो. स्वेरीच्या संशोधन पूरक वातावरणामुळे संशोधनात अधिक प्रगती झाल्याचे दिसून येते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक व मानसिक क्षमता लक्षात घेता भविष्यकाळात क्षितीज सारख्या व्यासपीठाची खरोखर आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते.’ असे प्रतिपादन कोईमतुर (तामिळनाडू) येथील कारुण्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्सेसचे डॉ. तपस देबनाथ यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेसा’ (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन), द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया), कोलकाता आणि स्टुडंट्स चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने आयोजित केलेल्या ‘क्षितीज २ के २१’ या तांत्रिक संशोधन उपक्रमाच्या ऑनलाइन उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.तपस देवनाथ मार्गदर्शन करत होते. प्रारंभी ‘क्षितीज’चे समन्वयक प्रा. संजय मोरे यांनी ‘क्षितीज २ के २१’ या तांत्रिक संशोधन उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीच्या यशस्वी वाटचालीबाबत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदिप वांगीकर यांनी सविस्तर माहिती दिली. या तांत्रिक कार्यक्रमामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन आणि टेक्नो क्विज अशा तीन प्रकारच्या ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात वीस पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून दीडशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी पोस्टर प्रेझेंटेशनच्या विजेत्या वारणानगर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी मानसी मुळीक तसेच पेपर प्रेझेंटेशन मध्ये विजेत्या ठरलेल्या ए.आय.एस.एस.एम.च्या विद्यार्थिनी श्रद्धा पोरे यांनी शिक्षण क्षेत्रात ‘स्वेरी’ ही ‘शिस्त आणि शिक्षण संस्कृती’ यासाठी राज्यात प्रसिद्ध असून ग्रामीण बरोबरच आता शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य स्वेरीने उज्वल केले आहे. असे सांगितले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रवीण ढवळे यांनी मानले.