मोहोळला जोडलेल्या १७ गावांसाठी ६ कोटींचा निधी — शिवसेना नेते राजाभाऊ खरे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- मोहोळ विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील १७ गावांत सुमारे ६ कोटी रुपये खर्चाची विकास कामे मंजूर झाली असून येत्या महिनाभरात या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते तथा उद्योजक राजाभाऊ खरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोपाळपूर येथील निवासस्थानी शनिवारी खरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या पत्नी तृप्ती खरे, सामाजिक कार्यकर्ते विजय खरे, युवा सेनेचे उ. सोलापूर तालुका प्रमुख आकाश गजघाटे, सोनू शिंदे, नेमिनाथ शिरसाट, आकाश फडतरे, उज्वला बनसोडे आदी उपस्थित होते.
राजाभाऊ खरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने प्रत्येक घटकांसाठी धडाडीने काम करणारे नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात लागेल तेवढा विकास निधी खेचून आणू. मुख्यमंत्री तसेच ग्रामीण रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, आ. भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्याने ९५/५ मधून २ कोटी १५ लाख आणि ग्रामसमृद्धी पाणंद योजनेअंतर्गत रस्त्यांसाठी ३ कोटी ७२ लाख असे ५ कोटी ८७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापुढील काळातही मोहोळ मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत, असेही खरे यांनी सांगितले.
काँक्रिट व पाणंद रस्त्यांची कामे लागणार मार्गी
मोहोळ मतदार संघातील खरसोळी, चळे, गोपाळपूर, तारापूर, औंढी, दादपूर, बेगमपूर, रामहिंगणी, कामती बु., वडदेगाव, हराळवाडी या गावांतील सिमेंट काँक्रीट रस्ते, संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक अशा कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर केले आहेत. गोपाळपुरसाठी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. बेगमपूर, वडदेगाव, मार्डी, होणसाळ, हगलूर, रानमसले, कौठाळी या गावात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन १२ पाणंद रस्त्यासाठी २४ ते ४८ लाख रुपये प्रत्येक गावासाठी मंजूर झाले असल्याचे खरे यांनी सांगितले.