Uncategorized

क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे विचार आजच्या काळात प्रेरणादायी – उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्मिता पाटील

स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९२ वी जयंती साजरी

छायाचित्र- स्वेरीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती प्रसंगी प्रतिमेचे पूजन करताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सौ.स्मिता पाटील सोबत डावीकडून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, विद्यार्थिनी सचिवा राजनंदिनी पाटील, अधिकारी सौ. पाटील, ज्ञानेश्वर (माऊली) जाधव, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना करताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सौ.स्मिता पाटील.

जोशबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर: ‘महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठी योगदान कधीही न विसरण्याजोगे आहे. विवाहानंतर देखील ज्योतिबांनी ठरवले की, जोपर्यंत सावित्री शिकत नाही तोपर्यंत समाजातील स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला करता येणार नाही. आज यशस्वी पुरुषामागे स्त्री असते हे जितकं खरं आहे तितकेच एका यशस्वी स्त्री मागे पुरुष खंबीरपणे उभा असतो. सावित्रीबाईंना ज्योतिबांची प्रेरणा होती. ज्योतिबा व सावित्री यांचे कार्य अखेरपर्यंत एकमेकांना अनुरूप असे राहिले. असमानतेच्या विरोधात उभे राहून स्त्रीच्या शिक्षणाची ज्योत जागृत ठेवण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे केले. सावित्रीबाई ह्या सामान्यातील असामान्य महिला होत्या. त्यांच्या कार्यामुळे त्या सुधारणावादी आणि स्त्री शिक्षणातील दीपस्तंभ बनल्या. त्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. ध्येयाने प्रेरित झालेली माणसं ऐतिहासिक कार्य करू शकतात. आपली स्वेरी ही शिक्षणसंस्था त्यापैकीच एक आहे. सुधारणावादी आणि जागतिक कीर्तीचे विचार घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सावित्रीबाईंचे विचार आजच्या काळात प्रेरणादायी ठरतात.’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सौ.स्मिता पाटील यांनी केले.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लेडीज हॉस्टेलमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९२ व्या जयंती निमित्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सौ.स्मिता पाटील हया मार्गदर्शन करत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. ज्ञानेश्वर (माऊली) जाधव हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रास्तविकात ‘महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळाली आहे. यासाठी विद्यार्थिनी दशेत मोबाईल, अधिक तथाकथित मैत्रिणी आणि टीव्ही या शत्रूंवर मात केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते.’ असे सांगून यशस्वी महिलांच्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.पाटील म्हणाल्या की, ‘मोबाईल पासून दूर राहून गरजेपुरताच त्याचा वापर करा. आपला फोकस अभ्यासावर ठेवा. डॉ. रोंगे सरांच्या शिस्तबद्ध शिक्षण पद्धतीमुळे आपले भविष्य उज्वल आहे. वडिलांच्या शिस्तीमुळेच मी वयाच्या तेविसाव्या वर्षी क्लास वन ऑफिसर झाले म्हणून तुमच्या जडणघडणीसाठी शिस्त ही अत्यंत महत्त्वाची ठरते. ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रचंड परिश्रम करा. आपल्या स्वेरीचे डॉ. रोंगे सर हे आजच्या काळातील चालते बोलते विद्यापीठ आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या विद्यार्थीनी या ठिकाणी शिकतात ही एक अभिमानाची गोष्ट आहे. दिवसा १४/१५ तास अभ्यास करण्याची क्षमता ठेवा कारण यशाचा मार्ग खडतर प्रयत्नातून जातो. यासाठी अभ्यासात सातत्य हवे आहे. कष्ट करण्यासाठी मागे पाहू नका. आज स्त्री ही स्वतःच्या पायावर उभारणे ही काळाची गरज आहे. एमपीएससी, यूपीएससी मध्ये यशस्वी होण्यासाठी जास्त काही करावे लागत नाही तर फक्त परिश्रम आणि शेवटपर्यंत अभ्यास करण्याची तयारी ठेवावी लागते. आपण महापुरुषांच्या जयंत्या यासाठी साजरा करतो की त्यांच्यातील महत्त्वाचे गुण आपल्याला प्रेरणा देत राहावेत.’ असे सांगून सौ.पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या योगदानावर प्रकाश टाकला.

अध्यक्षपदावरून बोलताना ज्ञानेश्वर (माऊली) जाधव म्हणाले की, ‘मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही ज्योत असते आणि ही ज्योतच आपल्याला अखंड प्रकाश देत असते. सावित्रीबाईंच्या काळातील नववधू आणि आत्ताची नववधू यांच्यात जमीन आसमानाचा फरक आढळतो कारण सावित्रीबाईंनी आता जुनी मक्तेदारी मोडून काढली आहे. राज्यामध्ये आदर्श महाविद्यालय पाहायचे असेल तर त्यांनी सरळ गोपाळपूरच्या स्वेरीला यावे आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी व कॅम्पस पहावा. स्वेरीसारख्या मोठ्या शिक्षण संस्थेकडे पाहिले असता सावित्रीबाई यांच्या कार्याची प्रचिती येते. डॉ. रोंगे सरांचे शैक्षणिक कार्य देखील असेच आहे.’ असे सांगून त्यांनी वसतिगृह व्यवस्थापक, विद्यार्थीनींचे स्वेरीतील पालक व कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, विश्वस्त एच.एम.बागल, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. करण पाटील, डॉ. मोहन ठाकरे, विद्यार्थिनी सचिवा राजनंदिनी पाटील, इतर प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होत्या. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी यशस्वी महिलांच्या गरुडझेपेवर विचार मांडले. सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकून उपस्थितांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close