Uncategorized

पुढील पिढीच्या भवितव्यासाठी नैसर्गिक साधनांची जोपासना व्हावी – डॉ. रविकिरण गोवेकर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक -श्रीकांत कसबे

पंढरपूर – “नैसर्गिक साधन संपत्ती ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे. नैसर्गिक साधन संपत्ती मानवी विकासासाठी अत्यंत गरजेची असते. सध्या वाढत्या लोकसंख्येनुसार लोकांच्या गरजा वाढत आहेत. त्यामुळे ह्या संपत्तीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरु आहे. परिणामी हे साठे पुढील पिढीसाठी राखून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शाश्वत विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन महसूल व विभागाचे मुख्य वन संरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भूगोल विभाग व सोलापूर भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत आयोजित ‘शाश्वत विकासासाठी नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन व व्यवस्थापन’ या विषयावर दोन दिवसीय आंतर्राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिन्सिपल डॉ. ज्ञानदेव मस्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, डॉ. प्रवीण सप्तर्षी, श्रीलंका येथील केलनिया विद्यापीठातील भूगोल विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. लाल मार्विन धर्मश्री, नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठ काटमांडू येथील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. उमेश कुमार मंडल, पार्वतीबाई चौगुले आर्ट्स आणि सायन्स कॉलेज गोवा येथील भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. नंदकुमार सावंत, हैद्राबाद येथील स्पॅशलहॉक जिओ इन्फोर्मेटीक्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. के. नवीनकुमार व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. जे.जी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रविकिरण गोवेकर पुढे म्हणाले की, “भारतात नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. हवा, पाणी, मृदा, खनिज संपत्ती, पेट्रोलियम खनिज साठे, दुर्मिळ औषधी वनस्पती, जंगले, जंगलातील जैव विविधता, जैव साखळीतील जैविक व अजैविक घटक हे महत्त्वाचे आहेत. रासायनिक आणि जैविक घटकांचे विघटन होवून खनिज साठे निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा काळ लागतो. त्यामुळे हे साठे अनमोल आहेत. त्याचे संवर्धन हाच सर्वोत्तम पर्याय आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल डॉ. ज्ञानदेव मस्के म्हणाले की, “वन्य जीव आणि पशू पक्षी हे जैव साखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी एखादा घटक नष्ट झाला तर त्याचे विपरीत परिणाम होवून नैसर्गिक पर्यावरणाचे असंतुलन निर्माण होते. अनेक जीव दुर्मिळ होत आहेत. अनेक पशू कायमचे नष्ट होत आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. पशू आणि पक्षी यांचा जीवनक्रम निसर्ग संवर्धनासाठी उपयुक्त असतो. याची जाणीव अभ्यासकांना असणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या अभ्यासातून आलेले निष्कर्ष शासनाला कळविणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे यांनी केले. प्रमुख मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. चंद्रकांत काळे यांनी करून दिला. या परिषदेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून अनेक विद्यापीठातून संशोधक, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक बहुसंख्येने उपस्थित होते. या परिषदेत विविध विषयांवर संशोधन पेपरचे सादरीकरण करण्यात येवून चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संशोधन पोष्टर सादरीकरण करण्यात आले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. भारत सुळे, प्रा. धनंजय कदम, डॉ. उत्तम माळी, डॉ. विलास लिंगडे, प्रा. हर्षकुमार घळके, प्रा. औदुंबर कुसुमडे, डॉ. प्रवीण उघडे, प्रा. वर्षा नाईकनवरे, प्रा. सचिन सोनकांबळे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, अभिजित जाधव, ओंकार नेहतराव, सुरेश मोहिते आदी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close