‘स्वेरी’ ही विद्यार्थ्यांसाठी दिव्य भूमी आहे. -एअर कमांडर आर. एन. मेरानी
श्री.श्री.रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची स्वेरीला सदिच्छा भेट

छायाचित्र -स्वेरीला श्री.श्री.रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे एअर कमांडर (निवृत्त) आर. एन. मेरानी यांनी सदिच्छा भेट दिली त्यांचे स्वागत करताना संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.बी. पी.रोंगे, याप्रसंगी सोबत श्री.श्री. रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे पदाधिकारी राजेंद्र धवन, भावेश पारेख, संतोष चौधरी, विठ्ठल बागल, सोनल वराडपांडे, साध्वी तत्वमणी, सोबसचे शाम, ऋग्वेद बागल, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व आदी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणारी एक उत्तम संस्था आहे. शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत स्वेरी ही संस्था ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुद्धा कटिबद्ध आहे याचे कौतुक वाटते.’ असे प्रतिपादन श्री.श्री.रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे एअर कमांडर (निवृत्त) आर. एन. मेरानी यांनी स्वेरीला दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान केले. ‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या माध्यमातून जनतेसाठी विधायक काम करण्याचे अखंड कार्य श्री.श्री. ट्रस्टच्या माध्यमातून भारतभर राबवले जाते. या संस्थेच्या बेंगलोर येथील प्रतिनिधींनी स्वेरीला भेट देऊन इथे चालणाऱ्या शिक्षण पद्धती तसेच संशोधनाबद्दल माहिती जाणून घेऊन स्वेरीच्या कार्याचे कौतुक केले.
पुढे बोलताना श्री. आर. एन. मेरानी म्हणाले की, ‘अभियांत्रिकीच्या क्षेत्रात विकसित होत असणारे तंत्रज्ञान जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. या माध्यमातून ग्रामीण भारतामध्ये कौशल्य विकास व रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्यायोगे ग्रामीण भारताला मजबूत आणि सक्षम बनवून विकासाच्या वाटेवर आपल्या राष्ट्राला गतिमान करता येईल. या विचाराला सत्यात उतरवण्यासाठी ‘स्वेरी’ सारखी संस्था निश्चित रित्या आमच्या संस्थेला सहकार्य करेल व भविष्यात ‘स्वेरी’ सोबत हे कार्य भव्य स्वरूपात घडल्याशिवाय राहणार नाही. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे सर यांच्या सहकार्याने हे कार्य प्रभावीपणे पुढे जाईल. याप्रसंगी श्री.श्री.रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पदाधिकारी असणाऱ्या राजेंद्र धवन, भावेश पारेख, संतोष चौधरी, विठ्ठल बागल, सोनल वराडपांडे, साध्वी तत्वमणी, सोबसचे शाम, ऋग्वेद बागल आदी उपस्थित होते. त्यांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.


