Uncategorized

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ 12 जुलैपर्यंत 6 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पुणे – आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत असून, दि. 12 जुलैपर्यंत 6 लाख 28 हजार 904 वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतली आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून 6 हजार 368 आरोग्य अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवत आहेत. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 5 खाटांचे तात्पुरते आयसीयू तयार केले आहेत. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.

वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विभागाचे ६,३६८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. त्या अनुषगांने विभागाकडून दररोज आढावा घेतला जात आहे. या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार असे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ कार्यरत आहे. यासह ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाब चा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात आली आहे, कारण आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने मोठी प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली आहे.

फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली आहे. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवेची वैशिष्ट्ये –

– पालखी सोहळा २०२४ साठी एकूण मनुष्यबळ – ६,३६८
– प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २५८
– वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४*७ उपलब्ध – ७०७
– दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ५८८५
– महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६
– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना – १३६
– पालखी मार्गावर आरोग्य दूत – २१२
– पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९
– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ८७
– आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.
– विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close