Uncategorized

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी

दिनांक 14 डिसेंबर रोजी केंद्रीय पथकातील सदस्य करमाळा तालुक्यातील मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या दुष्काळग्रस्त गावातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

सोलापूर, दि.13(जिमाका):-यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील 45 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलेला आहे. केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले असून पथकाने आज माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी पिकांची पाहणी केली.

यावेळी दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पथकातील सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी व पाझर तलावाची ही प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.
या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव श्रीमती सरोजिनी रावत यांचा समावेश आहे. या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुळेवाडी तालुका माळशिरस येथून केली. येथील शेतकरी सुनील मोहन हाके यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली तर शेतकरी दयानंद कोळेकर यांच्या शेतातील विहिरीतील पाणी पातळीची पाहणी ही पथकाकडून करण्यात आली. शिंगोर्णी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या मका पिकाची ही पाहणी पथकाकडून करण्यात आली. तर सांगोला तालुक्यातील आचकदणी, महूद बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, ज्वारी, ऊस डाळिंब या पिकांची पाहणी त्यांनी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माढा उपविभागीय अधिकारी ज्योती आंबेकर, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. के. वाघमोडे, सोलापूर लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर, वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण अधिकारी एम. ए .जे शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन एस नरळे यांच्यासह तहसिलदार सुरज शेजुळ, संतोष कणसे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, आनंद लोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, शिवाजी शिंदे तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय दुष्काळ पथकाने पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी, पाझर तलाव, शेतकऱ्यांच्या शेतातील कोरड्या पडलेल्या विहिरी, शेतकऱ्यांसाठी सध्या असलेल्या पाण्याची व्यवस्था, जनावरांचा चारा, पाणी पातळीची खोली आदी कामे याबाबत पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत असून तातडीने चारापाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, ऊस व अन्य पिकांची माहिती दिली. या नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पथकातील सदस्याकडे केली.

*केंद्रीय पथकाचा पाहणी अहवाल-
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी व शिंगोर्णी तर सांगोला तालुक्यातील आचकदाणी, महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तर उद्या दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी करमाळा तालुक्यातील
मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा केली जाणार आहे. केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणीनुसार केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर केंद्र शासनाकडून त्या अहवालानुसार मदत जाहीर करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते.
000000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close